Tarun Bharat

बस चालवल्या प्रकरणी जयंतरावांवर गुन्हा दाखल करा

भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी : स्वातंत्र्य दिनी पाटील यांनी सजवलेली बस चालवली : कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/ इस्लामपूर

इस्लामपूर एसटी आगारामध्ये स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एस टी महामंडळाची ‘विठाई’ ही बस सजवण्यात आली होती. दरम्यान माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी परवाना नसताना बेकायदेशीरपणे शासकीय वाहन चालवून नियमांचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीसांकडे केली. यावेळी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत इस्लामपूर आगारातील बस क्रमांक एम एच १३ सी यू ८१२२ सजवण्यात आली होती. दरम्यान आ. जयंत पाटील यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे चालकाची नियुक्ती नाही. त्यांच्याकडे बसचालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी आवश्यक असणारा आरटीओचा बॅच बिल्ला नाही. तसेच जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणारी अनुप्राप्ती व अनुभव नसताना बेकायदेशीरपणे शहरातून ही बस चालवली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिना निमित्त शहरात नागरीकांची गर्दी होती. पादचारी दोन चाकी, तीन चाकी, चारचाकीतून नागरीक शहरातून ये-जा करत होते. दरम्यान आ. पाटील यांच्याकडे कोणताही अनुभव नसताना बेकादेशीररित्या बसचालवत असताना दुर्घटना घडून नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण झाला असता. वाहनांचे नुकसान झाले असते. सरकारी व सार्वजनिक वापराचे वाहन चालवून पादचारी व इतर वाहनांना धोका निर्माण होईल अशा परस्थितीत वाहन चालवले. ही गंभीर बाब लक्षात घेता त्यांच्यावर कलम ३/१८०, ५/१८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.

या निवेदनावर भाजप वाळवा तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे, भायुमोचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भायुमो इस्लामपूर शहरचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह्या आहेत. तसेच यावेळी भाजप युवामोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, जिल्हा भाजप चिटणीस संजय हवलदार, भाजपा युवामोर्चाचे संघटन सरचिटणीस प्रविण परीट, रामभाऊ शेवाळे, आबा मोरे, अक्षय कोळेकर, अक्षय पाटील, स्वप्नील कोरे, अर्जुन पाटील, विकास परीट यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मी खा. सुप्रिया सुळेंना अटक केली
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले. दरम्यान हे पदाधिकारी चव्हाण यांच्या केबीनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी बसून होते. यावेळी चव्हाण यांनी ‘मी खा. सुप्रिया सुळेंना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळ पर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा दिला.

Related Stories

कोल्हापूर : पेठ वडगाव येथे कोव्हिड सेंटर सुरु करण्याची गरज

Archana Banage

कोल्हापूर शहरात गेला पहिला कोरोनाचा बळी

Archana Banage

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी २६ सप्टेंबर नोंदणी करा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांनाच कौल

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे 5 बळी, 110 पॉझिटिव्ह

Archana Banage

दिलबहार तालीम मंडळाने पटकावला महापौर चषक

Abhijeet Khandekar