हनुमानाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप; जुना राजवाडा पोलिसांना दिले निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल गणी यांनी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामभक्त पवनपुत्र हनुमानाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल मंत्री सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.
या संदर्भात कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी ऍड. सुधीर जोशी, अनिरूद्ध कोल्हापुरे, महेश उरसाल, अशोक रामचंदानी, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, अजित ठाणेकर, सचिन तोडकर, डॉ. संतोष निंबाळकर, ऍड. केदार मुनीश्वर, सुजित जोशी, अमित कांबळे, कपिल कदम, अमोल माने, सुरज चव्हाण, अनिकेत कुलकर्णी, पराग फडणीस आदी उपस्थितहाते.
या संदर्भात जुना राजवाडा पोलिसांना दिलेल्या निवेदनात हिंदूत्ववादी संघटनांनी म्हटले आहे की : भगवान श्री हनुमान हे हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असून ते परमपूज्य आहेत. आम्ही भगवान हनुमान यांची देखील पूजा आणि आराधना करत असतो. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल गणी (रा. सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांची 26 एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामधून मंत्री अब्दुल सत्तार हे एका व्यक्तीस अत्यंत अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करत असल्याचे दिसते. संभाषणात त्यांनी हनुमानाविषयी अनुद्गार काढणारे आक्षेपार्ह शब्द उच्चारले आहेत. मंत्री सत्तार यांच्या विधानामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकाराची सखोल चौकशी आणि तपास करून मंत्री सत्तार यांना कायद्याप्रमाणे कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.