भाजयुमोची पोलीस अधीक्षकांकडे मागणी : मोदी, शहा यांच्या पुतळ्य़ांचे बेकायदेशीर दहन केल्याचा आरोप
प्रतिनिधी/कोल्हापूर
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळा बेकायदेशीररित्या दहन करणाऱया युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱयांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना या मागणीचे निवेदन दिले. तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमितजी शाह यांची प्रतिमा असलेले पुतळे कोल्हापूर युवक कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस कार्यालयाच्या दरात दहन करण्यात आले. विना परवानगी व बेकायदेशीर रित्या हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे राष्ट्राच्या नेत्यांची प्रतिमा डागाळण्याबरोबर त्यांच्याबद्दल समाजात गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्याचबरोशबर समाजात अशांतताही पसरण्याचा धोका युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विवेक वोरा, पारस पलीचा, सुनील पाटील, गौरव सातपुते, नितीश कुलकर्णी, ओमकार गोसावी उपस्थित होते.