अनिल बेनके चषक अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहन मोरे संघाने साईराज संघाचा 4 गड्यांनी तर झेन स्पोर्ट्स मुंबईने जीजी स्पोर्ट्स एसआरएस हिंदुस्थान संघाचा 5 गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. ओमकार देसाई (मोहन मोरे), बिलाल शेख (झेन स्पोर्ट्स), अर्शफ खान (झेन स्पोर्ट्स) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात केआर शेट्टी रायगड संघाने 10 षटकात सर्व बाद 100 धावा केल्या. अंकुरसिंगने 28, प्रथमेशने 16 तर सोमसिंगने 13 धावा केल्या. झेनतर्फे अनिकेत सनपने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेन स्पोर्ट्सने 9.5 षटकात 6 बाद 101 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. अर्शफ खानने 55 तर मुन्ना शेखने 23 धावा केल्या. 5 बाद 32 अशी नाजुक स्थिती असताना अर्शफ व मुन्ना यांनी सहाव्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. केआर शेट्टी संघातर्फे अंकुरसिंग व सोमशेखर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
पहिल्या उपांत्य सामन्यात साईराज संघाने 12 षटकात 8 बाद 132 धावा केल्या. सुहास पवारने 29, दाजी नाईकने 27 तर इलु इबादने 3 षटकारांसह 23 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे प्रज्योत अंबीरेने 26 धावात 4, मयुरेश वाघमारे व ओएस बाबा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 9.5 षटकात 6 बाद 133 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. ओमकार देसाईने 4 षटकार 5 चौकारांसह 46, कृष्णा गवालीने 27 धावा केल्या.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात एसआरएस जीजी बॉईज संघाने 11.4 षटकात सर्व बाद 105 धावा केल्या. ईंजमाम नाईकवाडीने 33 तर विकी पुजारीने नाबाद 25 धावा केल्या. झेनतर्फे बिलाल ज्युनियरने 24 धावात 4, वमिकने 3 तर इम्रानने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेन स्पोर्ट्सने 10.5 षटकात 5 बाद 106 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. मुन्ना शेखने 27, अर्शफ खानने 26 तर साहिल शेखने 13 धावा केल्या. एसआरएसतर्फे सुधीर व साहिल यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.
सामन्यानंतर बाळण्णा कग्गणगी, आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते ओमकार देसाई याला तर दुसऱ्या सामन्यात कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी, संजय बेळगावकर, आमदार अनिल बेनके, प्रितम नसलापुरे आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर बिलाल शेख ज्युनिअर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अंतिम सामना बुधवारी सकाळी 9 वाजता मोहन मोरे इलेव्हन व झेन स्पोर्ट्स मुंबई यांच्यात खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील व पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण प्रसंगी प्रभाकर कोरे, माजी आम. महांतेश कवटगीमठ, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.