क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित 14 वर्षाखालील मुलांच्या यूजी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत केएलएसने केंद्रीय विद्यालय – 2 चा 8 धावांनी तर केएलई इंटरनॅशनल संघाने ठळकवाडी संघाचा 63 धावांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. सुरेंद्र पाटील (केएलएस), कलश बेनकट्टी (केएलई) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केएलएस संघाने 22 षटकात 5 गडी बाद 141 धावा केल्या. त्यात सुरेंद्र पाटीलने 66, सोहम पाटीलने 25 धावा केल्या. केंद्रीय विद्यालयातर्फे यश नाईक 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केंद्रीय विद्यालय संघाचा डाव 21.1 षटकात 132 धावात आटोपला. त्यात आर्यन मुरुडकर 33 धावा केल्या. केएलएसतर्फे सिद्धार्थ रायकर व सुरेंद्र पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केएलई संघाने 22 षटकात 5 गडी बाद 157 धावा केल्या. शुभम खोत 78, कलश बेनकट्टी 21 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे प्रज्योत उघाडेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाचा डाव 19.3 षटकात 93 धावात आटोपला.