Tarun Bharat

Sangli; अखेर १५ दिवसांनी माणिकराव पाटील यांच्या खुनाचा उलगडा

अपहरण करून खंडणी मागण्याच्या होता उद्देशः मारहाणीमध्ये ते बेशुध्द पडल्याने नदीत टाकलेः तीन संशयितांना अटक

सांगली प्रतिनिधी

बांधकाम व्यावसायिक माणिकराव विठ्ठल पाटील यांच्या खूनाचा अखेर १५ दिवसांनी उलगडा झाला आहे. याप्रकरणी तीन संशयितांना सांगली ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. किरण लखन रणदिवे वय २६ रा कृष्णनगर कारंदवाडी ता. वाळवा, अनिकेत उर्फ निलेश श्रेणीक दुधारकर (२२ रा. कारंदवाडी ,ता. वाळवा) आणि अभिजीत चंद्रकांत कणसे (२० रा. कृष्णनगर कारंदवाडी ता. वाळवा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पाटील यांचे अपहरण करून खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करण्यात आले होते. पण, मारहाणीमध्ये पाटील हे बेशुध्द पडल्याने त्यांना वारणा नदीत फेकल्याची कबुली या संशयितांनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार बैठकीत दिली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांना १३ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास या तिघांनी त्यांना तुंग येथील भारत बेंझ शोरूमसमोरील प्लॉट दाखविण्यास बोलवून घेतले होते. पाटील त्याठिकाणी आल्यानंतर निर्जनस्थळी असणाऱयाठिकाणी नेण्यात आले. आणि त्याठिकाणी पाटील यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये पाटील आणि या संशयितांमध्ये झटापटही झाली. ही झटपटीमध्ये पाटील हे खाली पडले. पाटील हे आता आरडा-ओरडा करणार म्हणून या संशयितांनी हात बांधून त्यांना त्यांच्या स्कोडा गाडीच्या डिग्गीमध्ये टाकले. त्याचवेळी तुंग येथे मारूतीच्या दर्शनाला गेलेले भक्त मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे या संशयितांना दिसल्यावर त्यांनी ही गाडी आडवळणी रस्त्यांनी तुंगमार्गे कवठेपिरान येथील निर्जणस्थळी नेली. त्यावेळी डिग्गी उघडून या संशयितांनी पाहिले असता पाटील यांची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे या संशयितांना पाटील हे मयत झाले असल्याची शंका आली आणि त्यांनी तशीच ही स्कोडा गाडी कवठेपिरान, दुधगाव मार्गे घेवून कुंभोज ब्रिजवरून माणिक पाटील यांना वारणा नदीच्या पात्रात फेकून दिले. व ही स्कोडा गाडी कोंडिग्रे फाटा, इचलकरंजी रोड येथे रस्त्याच्या कडेला लावून ते तिघे हातकणंगले, शिगाव, आष्टा मार्गे कारंदवाडी येथे आले.
तीन दिवसांनी पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथे आढळला
वारणा नदीच्या पात्रात ज्यावेळी पाटील यांना टाकले होते. त्यावेळी पाणी कमी-कमी होत चालले होते. तीन दिवसांनी पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथे वारणा पात्रात आढळला. त्यावेळी पोलिसांना पाटील यांचे हात काळय़ा रस्सीने बांधल्याचे आढळले आणि त्यांनी तात्काळ याचा तपास सुरू केला. हा तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर आलेल्या कॉलची माहिती काढण्यात सुरवात केली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांकडे चौकशी सुरू करण्यात आली. पण पोलिसांना यातून काहीही धागेदोरे आढळले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचे आर्थिक हितसंबंध कोणाशी होते. याचीही चौकशी सुरू केली. त्यांना बोलावून त्यांच्याकडेही चौकशी केली. पण, यातून काहीच माहिती मिळाली नाही. ज्या परिसरातून त्यांचे अपहरण झाले. तसेच मृतदेह आढळला. त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पण, त्यामध्येही काहीही आढळले नाही. त्यामुळे ज्या काळय़ा रस्सीने त्यांना बांधले होते. ती रस्सीही कोणत्या दुकानात मिळते. अशा सर्व दुकानदारांची तपासणी करण्यात आली. पण, यातूनही काही मार्ग मिळाला नाही.

अखेर माहितीगाराकडून माहिती मिळाली.
या खूनाचा उलगडा करण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक, सांगली ग्रामीणचे पथक, सांगली शहर आणि विश्रामबागचे पथक काम करत होते. पण तरीही कोणताही सुगावा लागला नव्हता. त्यामुळे पोलीसांनी या परिसरातील काही माहितीगारांकडून माहिती काढली असता हे तिघे संशयित या प्रकरणात असल्याचे समोर आले. त्यावेळी या तिघांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने पकडल्यावर त्यांनी आपण हा खून पैशाच्या लालसेपोटी केल्याचे कबूली दिली. पण, आपण पाटील यांना मारणार नव्हतो. तर त्यांच्या कुटुंबियाकडून खंडणी वसूल करणार असल्याचे सांगितले. पण, ते झटपटीत बेशुध्द पडल्याने त्यांना नदीत टाकल्याचे त्यांनी कबुली दिली.
घटनाक्रम
13 ऑगस्ट रात्री 8:30 पाटील तुंग येथील भारत बेंज शोरूम जवळ आले.
13 ऑगस्ट रात्री 9:00 पाटील आणि संशयितांच्यात झटापट.
13 ऑगस्ट रात्री 9.30 पाटील बेशुध्द पडल्याचे समोर.
13 ऑगस्ट रात्री 10:30 पाटील यांना वारणा नदीत फेकले.
15 ऑगस्ट : पाटील यांचे अपहरण झाल्याची मुलांकडून फिर्याद.
17 ऑगस्ट सकाळी : पाटील यांचा मृतदेह कवठेपिरान येथे नदीत आढळला.
28 ऑगस्ट : पाटील यांच्या खूनाचा उलगडा.
अपहरणाचा प्लॅन पण खून
किरण रणदिवे हा ड्रायव्हरचे काम करतो. त्याला कर्ज झाल्याने त्याने अपहरणाचा प्लॅन केला. त्यामध्ये अनिकेत आणि अभिजीत या कामगार मित्रांना सहभागी करून घेतले. माणिक पाटील यांची माहिती काढली. त्यांच्याकडून भरपूर खंडणी मिळू शकते याची खात्री झाली. त्यानंतर एका दारूडय़ाचा साधा मोबाईल चोरी केला. त्या मोबाईलवरून पाटील यांनी प्लॉट दाखविण्याच्या बहाण्याने रात्रीचे निर्जणस्थळी बोलविले. त्याठिकाणी अपहरण करून खंडणी मागण्याचा बेत होता. पण, पाटील आणि या तिघा संशयितांच्यात झटपट झाली. या झटपटीमुळे त्यांना त्यांच्याच डिग्गीत टाकण्यात आले. त्यानंतर अर्धातासांनी पाटील हे बेशुध्द पडले होते. पण, संशयितांना ते मयत झाल्याची शंका आल्यावर त्यांनी पाटील यांना नदीत फेकले. अपहरणाचा प्लॅन केला पण खून झाला.
खूनाचा उलगडा करण्यासाठी 100 जणांची टीम
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत निशाणदार, भगवान पालवे, सागर पाटील, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलवडे, बिरोबा नरळे, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, चेतन महाजन, अरूण औताडे, आर्यन देशिंगकर, सचिन कणप, विक्रम खोत, यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने हा खूनाचा उलगडा केला आहे.

Related Stories

ज्यादा प्रवासी भरलेल्या आटपाडी-सांगली एसटीवर पोलिसांची कारवाई

Archana Banage

खानापूर नगरपंचायत नगराध्यक्षपदी डॉ.उदयसिंह हजारे : उपनगराध्यक्षपदी सुवर्णा कांबळे

Abhijeet Khandekar

सांगली : कृष्णाकाठावर पाण्याची पातळी स्थिर

Archana Banage

सांगली : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

सांगली : जत तालुक्यात रुग्णसंख्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत : ना. जयंत पाटील

Archana Banage

कुपवाडमधील चौघा सराईत गुन्हेगारांची टोळी तीन जिल्ह्यातून हद्दपार

Archana Banage