निफ्टी 16,000 अंकांवर ः सेन्सेक्स 344 अंकांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबइ
भारतीय भांडवली बाजारात मागील चार दिवसांमध्ये सुरु असलेल्या घसरणीचा प्रवास अखेर चालू आठवडय़ातील अखेरच्या दिवशी शुक्रवारी थांबल्याचे पहावयास मिळाले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स 344 अंकांच्या मजबूतीसह बंद झाला. जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण व विदेशी गुंतवणूकदारांच्या लिलावामुळे देशातील बाजार तेजीत राहिले होते.
मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 344.63 अंकांच्या मजबूतीसह 0.65 टक्क्यांच्या तेजीसह निर्देशांक 53,760.78 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 110.55 अंकांनी वधारुन 0.69 टक्क्यांसोबत निर्देशांक 16,049.20 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समधील समभागांपैकी हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, मारुती सुझुकी, लार्सन ऍण्ड टुब्रो, एचडीएफसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, नेस्ले आणि भारती एअरटेल यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत. यासोबतच अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, पॉवरग्रिड कॉर्प, एचसीएल टेक्नॉलॉजी, विप्रो, डॉ.रेड्डीज लॅब आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
प्रमुख घडामोडींचा प्रभाव
जागतिक पातळीवर काही प्रमाणात स्थिर वातावरण निर्माण होत असल्याचे संकेत म्हणून सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत नरमाई आहे. यामुळे देशातील भांडवली बाजाराला शुक्रवारी प्रोत्साहन मिळाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. यासह माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे अहवाल हे विरुद्ध बाजूने आल्याने आणि रुपयामधील घसरण तसेच जागतिक पातळीवरील मंदी सदृश्य संकेतामुळे बाजारातील वृद्धी काही प्रमाणात स्थिर राहिली असल्याची नोंद केली आहे.