ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यावर अद्याप निर्णय झालेला नाही. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, यंदा शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा ठाकरेंचा की शिंदेंचा यावरुन आता रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने यापूर्वीच दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेकडे शिवाजी पार्कच्या मैदानासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आज शिंदे गटानेही याच शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, पालिकेने अद्याप या अर्जांवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक अतूट नातं आहे. या निमित्ताने राज्यातील शिवसैनिक एकत्र येतात. यंदा 5 ऑक्टोबरला दसरा आहे. गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. विचारांचं सोनं लुटून शिवसैनिक पक्षाचं काम जोमानं करायचा पण आता शिवसेनेत एकनाथ शिंदेनी बंड केल्याने चित्र पालटलं आहे. शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची हा प्रश्न आता न्यायालयात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाकडे जाईल अद्याप सांगता येत नाही.
अधिक वाचा : पवना धरणात बुडून 2 पर्यटकांचा मृत्यू; 5 जणांना वाचविण्यात यश
पण, तत्पूर्वी दसरा आल्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर शिंदे गटानेही दावा केला आहे. त्यामुळे दसरा मेळावा नेमका कोणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा यावरुन वाद सुरू आहे. दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, म्हणून पालिकेकडे अर्ज केला आहे. पालिकेने अद्याप यावर कोणताही निर्णय दिला नसला तरी ठाकरेंच्या परंपरेला शिंदे छेद देणार? की उद्धव ठाकरे या सर्वांना छेद देत दसरा मेळावा दिमाखात पार पाडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.