Tarun Bharat

अखेर बाबुशविरोधी मूळ तक्रार कोर्टात सादर

वेळकाढूपणाबद्दल सीबीआयला फटकारले होते न्यायालयाने ; पणजी पोलीस स्थानकावरील 2008 मधील हल्ला प्रकरण

प्रतिनिधी /पणजी

पणजी पोलीस स्थानकावरील हल्लाप्रकरणी काल शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी बाबुश मोन्सेरात व इतर संशयितांच्या विरोधात नोंद केलेल्या तक्रारीची मूळ प्रत सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात सादर केली. दोन संशयितांची ओळख पटवणे बाकी असून या दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणच्यावेळी दोन्ही संशयितांची ओळख परेड तसेच उलटतपासणी होण्याची शक्यता आहे. ही सुनावणी 6 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

दुसऱया बाजूने बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात बलात्कारप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात पीडित युवतीने हस्तक्षेप याचिका सादर केली असून ती आजारी असल्याने काल न्यायालयात हजर राहू शकली नाही, त्यामुळे या खटल्याबाबतचीही सुनावणी 12 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

तक्रारीची मूळ प्रत न्यायालयात सादर

सीबीआयने हल्ला प्रकरण तक्रारीची मूळ प्रत न्यायालयात सादर केल्याने सध्या प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्री असलेल्या बाबुश मोन्सेरात यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 2008 मध्ये पणजी पोलीस स्थानकावर मोन्सेरात व इतर अनेकांनी हल्ला केल्याचा आरोप असून त्यावरील खटल्याची सुनावणी पणजीच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. सुरुवातीला पणजी पोलिसांनी ही तक्रार नोंद केली होती. कालांतराने हे तपासकाम सीबीआयकडे देण्यात आले होते.

सीबीआयने चालविला होता वेळकाढूपणा

मोन्सेरात आणि त्यांच्या सहकाऱयांनी पणजी पोलीस स्थानकावर हल्ला केल्याची मूळ तक्रार पणजी पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. ती तक्रार न्यायालयात सादर करण्याचा आदेश मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने सीबीआयला दिला होता. मात्र सीबीआयने वेळकाढूपणा करून सदर तक्रार सादर केली नव्हती. त्यामुळे सीबीआयतर्फे या सुनावणीसाठी चालढकल होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून मूळ तक्रार सादर करण्याचा आदेश जारी केला होता. अखेर सीबीआयने काल शुक्रवारी तक्रारीची मूळ प्रत सादर केली.

तपास अधिकाऱयांने काय सांगितले न्यायालयात..?

पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणाबाबत तक्रार नोंद केल्यानंतर सुरुवातीला या तक्रारीचे तपास अधिकारी तुषार लोटलीकर हे काम पाहत होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. काल शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी तुषार लोटलीकर यांनी न्यायालयात आपला जबाब नोंद केला. यात त्यांनी ज्या दिवशी पोलीस स्थानकावर हल्ला झाला त्या रात्री बाबुश मोन्सेरात यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात रात्री 10 वाजता पोलीस स्थानकात आल्या होत्या, असे नमुद केले. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले होते, त्यापैकी 21 जणांना उपचारासाठी इस्पितळात दाखल केले होते. तसेच या हल्ल्याच्यावेळी आग लावल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले होते, असेही त्यांनी न्यायालयास सांगितले.

बलात्कारप्रकरणातील पीडीत युवती आजारामुळे गैरहजर

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण हे 2016 साली झाले होते. बाबुश मोन्सेरात यांनी पीडित तरुणीला 50 लाख रुपयांना खरेदी करून नंतर तिला आमलीपदार्थ पाजला व तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. काही दिवस कोठडीत घालविल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. पीडित मुलगी मोन्सेरात यांच्या मिरामार येथील दुकानात नोव्हेंबर 2015 ते 4 मार्च 2016 या दरम्यान कामाला होती. रोझी नामक महिलेने पीडित युवतीची मोन्सेरात यांच्याशी ओळख करून दिली होती. रोझीच्या विरोधातही गुन्हा नोंद आहे.

Related Stories

जीसीए सीनियर संघ प्रशिक्षकपदी प्रकाश मयेकर; कामत ज्युनियर्सचे प्रशिक्षक

Amit Kulkarni

वैयक्तिक फायद्यासाठीच भिंगीचा भाजपात प्रवेश

Amit Kulkarni

खासगी विद्यापीठ स्थापन करणे होणार शक्य

Patil_p

विणकाम हस्तकरागीरीवर पणजीत कार्यशाळेचे उद्घाटन

Amit Kulkarni

दुसऱया मजल्यावर अडकलेल्या बैलाला वाळपई अग्निशामक दलाकडून जीवदान

Amit Kulkarni

पेडणेकरांना चुना लावाल तर पस्तावाल

Amit Kulkarni