प्रतिनिधी/ वास्को
बेळे वेलसांव भागातील सातू सतरकराच्या झोपडीत अखेर शनिवारी संध्याकाळी वीजेचा लख्ख प्रकाश पडला. त्याच्या ऐशी वर्षे जुन्या घरात वीज नव्हती. त्याचे कुटुंब दिव्याच्या उजेडावरच जीवन ढकलत होते. आमदार अँथनी वास यांनी शनिवारी संध्याकाळी कळ दाबून त्यांच्या घरात वीजेच्या प्रकाशाचा शुभारंभ केला. यावेळी वेलसांवच्या सरपंच, माजी सरपंच तसेच पंच उपस्थित होते.
सातू सतरकर या गरीबाची झोपडी सध्या मोडकळीस आलेली आहे. त्याच्या घरात वीज नव्हती. गरीबीमुळे कसलीच आधुनिक उपकरणेही त्याच्या घरात नाहीत. कसल्याच शासकीय योजनेचा लाभही त्याला मिळालेला नाही. अत्यंत गरीबीत जगणाऱ्या या कुटुंबाची व्यथा समजताच स्थानिक आमदार अँथनी वास यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या कुटुंबाची भेट घेतली होती. दुसऱ्याच दिवशी त्याच्या झोपडीला वीज पुरवण्याच्या कामाला सुरवात झाली होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर काल शनिवारी संध्याकाळी त्यांच्या झोपडीतील वीजेची कळ दाबली अन् या झोपडीत ऐशी वर्षानंतर लख्ख प्रकाश पडला. यावेळी झोपडी बाहेर रोषणाई करण्यात आली होती. आमदार अँथनी वास यांनी वीज खाते व सतरकर कुटुंबाला वीज मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वाचे आभार मानले. तसेच घराची अवस्था वाईट असल्याने या घराचे चांगल्या सुरक्षीत घरात रूपांतर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार वास यांनी म्हटले आहे.