शासनाकडून 1 कोटी 86 लाखांचा निधी मंजूर : सहयक अनुदाने (वेतन), कंत्राटी सेवा, देशांतर्गत प्रवासखर्चाचा समावेश
प्रवीण देसाई/कोल्हापूर
मराठा, कुणबी-मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सुरु केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेला आर्थिक बळ मिळत आहे. नुकताच सरकारने सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरीता सहायक अनुदाने (वेतन), कंत्राटी सेवा, देशांतर्गत प्रवासखर्चासाठी संस्थेला 1 कोटी 86 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
शासनाकडून ‘सारथी’ संस्थेच्या आस्थापना व इतर बाबीसाठी अनुदान अर्थसंकल्पीत केले होते. त्याला आवश्यक निधीसाठी शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या वेतनासह आस्थापनेच्या इतर खर्चासाठी 1 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे स्वरुप सहाय्यक अनुदान (वेतन) 1 कोटी रुपये, कंत्राटी सेवेसाठी 85 लाख रुपये व देशांतर्गत प्रवासखर्चासाठी 1 लाख रुपये असे आहे. सध्या ‘सारथी’ कडे जवळपास 14 अधिकारी व अंदाजे 34 कंत्राटी कर्मचारी आहेत. पुणे येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयासह इतर उपकार्यालयातील अधिकारी, कर्मचारीवर्गासाठी हा निधी मिळणार आहे.
वितरीत करण्यात आलेले 1 कोटी 86 लाख रुपये हे संबंधित उदिष्टावर निधीच्या मर्यादेत खर्च होण्यासाठी नियंत्रक अधिकारी म्हणून ‘सारथी’च्या व्यवस्थापकीय संचालकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. तर आहरण व संवितरण अधिकारी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. शासनाने या निर्णयाद्वारे अधिकारी, कर्मचार्यांच्या वेतनाबरोबरच इतर खर्चाची तरतुद केली आहे. यामुळे ‘सारथी’ संस्थेच्या कामाला अर्थिक बळ मिळत असल्याचे चित्र आहे.
शासनाकडून ‘सारथी’ संस्थेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या वेतनासह इतर बाबीसाठी 1 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मिळण्याची प्रक्रिया निरंतर आहे. त्यानुसार ही रक्कम मिळाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
-अशोक पाटील, अपर जिल्हाधिकारी तथा निंबधक, ‘सारथी’ संस्था, पुणे