पुतीन यांच्या धमकीला धुडकाविले ः
स्वीडन आणि फिनलंड यांच्यात दोन युरोपीय देशांनी नाटो सदस्यत्वासाठी एकत्रितपणे अर्ज करण्यासाठी सहमती झाली आहे. मे महिन्याच्या मध्यास दोन्ही देश नाटोत सामील होण्यासाठी अर्ज करू शकतात. युक्रेनने मागील वर्षी नाटोमध्ये सामील होण्याची घोषणा केली होती, याचमुळे रशियासोबत दीर्घकाळ तणावानंतर पूर्व युरोपमध्ये एक भीषण युद्ध सुरू झाले. रशियाने फिनलंड अन् स्वीडनला देखील धमकी दिली आहे.
स्वीडनच्या सरकारने फिनलंडसमोर दोन्ही देशांनी 22 मे रोजी नाटो सदस्यत्वासाठी एकत्रितपणे अर्ज करावा अशी इच्छा दर्शविली आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर स्वीडन आणि फिनंलडमध्ये नाटोत सामील होण्याची मागणी वाढत आहे. हेलसिंकी आणि स्टॉकहोमने मागील काही वर्षांमध्ये स्वतःचे द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढविले आहे.
जूनमध्ये नाटो सदस्यत्व
दोन्ही नॉर्डिक देश रशियाच्या आक्रमतेच्या विरोधात नाटोमध्ये सामील होऊ इच्छितात. जूनपर्यंत स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन या नाटोमध्ये सामील होण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकतात असे मानले जात आहे. फिनलंड आणि स्वीडन हे देश रशियाच्या अत्यंत नजीक आहेत. फिनलंडची सीमा रशियाला लागून आहे. फिनलंड दीर्घकाळापासून तटस्थ देशाच्या भूमिकेत राहिला आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर फिनलंडला भीती सतावत आहे. याचमुळे फिनलंडचे सरकार तसेच तेथील जनता नाटोमध्ये सामील होण्याचा विचार करत आहे.
रशियाकडून क्षेपणास्त्रs तैनात
आर्क्टिकला लागून असलेल्या भागात रशियाने फिनलंड आणि स्वीडनच्या सीमेनजीक क्षेपणास्त्रs आणि अन्य घातक शस्त्रास्त्रs तैनात केली आहेत. दोन्ही देशांकडून नाटो सदस्यत्वाचे होणार प्रयत्न पाहता रशिया नाराज आहे. फिनलंडचे हे पाऊल युरोपमधील सुरक्षा स्थिती सुधारणार नसल्याची प्रतिक्रिया रशियाच्या राष्ट्रपतीच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे.