25 लाखांची नुकसानी , गावकरवाडा-उसगांव येथे पहाटेची घटना : सुदैवाने जीवितहानी टळली
प्रतिनिधी/ फेंड़ा
गावकरवाडा-उसगांव येथे सोफा, खुर्च्या बनविणाऱ्या फेन्सी स्टील कंपनीला आग लागून सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल शनिवारी पहाटे 4 वा. सुमारास उघडकीस आली. या आगीच्या भक्ष्यस्थानी कंपनीचे कार्यालय व गोदाम पूर्णत: खाक झाले आहे. फोंडा अग्निशामक दलाने 4 बंब वापरून आग आटोक्यात आणण्यात महत्त्वाचे मदतकार्य केले. अचानक वाढलेल्या वीजेच्या दाबामुळे? की शॉट सर्किटमुळे आग? याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
फोंडा अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास आलेल्या तक्रारीनुसार फेंडा टीम घटनास्थळी धाव घेतली. मुकेश मालवीया नामक व्यक्तीच्या मालकीची फेन्सी स्टील कंपनीत शुक्रवारी रात्री कंपनीमध्ये चार कामगार झोपी गेले होते. त्यापैकी दोघेजण कार्यालयात झोपी गेले होते. कार्यालयात झोपी गेलेल्या कामगारांना धुराचा वास येऊन जाग आल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर मालकाला व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करीत आग सर्वत्र पोहचली होती.
महत्त्वाची कागदपत्रे, कच्चा मालासह कार्यालय पूर्णत: आगीत खाक
आगीच्या भक्ष्यस्थानी गोदाम व कार्यालयातील संगणक, प्लायवुड, कुशन, कच्चा माल, ग्लास, रबर, हायड्रॉलीक पंपसह महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. कंपनीच्या पाठीमागे लागलेली आग गोदामात पोहचल्यानंतर रौद्ररूप धारण करीत कार्यालयत पोहचून सर्व दस्ताऐवज आगीत खाक झाले. आगीत खाक झालेल्या साहित्यासह इतर मालमत्ता मिळून सुमारे 25 लाखांचे नुकसान झाल्याचा दावा मालविया यांनी केला आहे.
अचानक वीज दाब वाढला की शॉटसर्किट ?
आग नेमकी कशी लागली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. मागील चार पाच दिवसांपासून गावकरवाडा भागात नवीन वीजवाहिन्या जोडण्याचे काम सुरू होते. त्यानिमित्त शुक्रवारी वीज खंडित होती. उशिरा रात्री वीज पूर्ववत झाल्यानंतर अचानक वीजेचा दाब वाढून शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागली की अन्य कारणामुळे याची शहानिशा अग्निशामक दलातर्फे करण्यात येत आहे.
फोंडा, कुंडई अग्निशामक दलाचे 4 बंबसह महत्त्वाचे मदतकार्य
फोंडा अग्निमशामक दलाने महत्त्वाचे मदतकार्य करताना 3 बंब तसेच कुंडई अग्निशामक दलातर्फे 1 बंब वापरण्यात आला. यावेळी फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवू लांबोर, संतोष गावकर, गणेश नाईक, मोतीराम गोवेकर, गणेश सांगोडकर, मनोज नाईक, जानू ताटे, बशीर मुजावर, योगेश्वर पाटील, योगानंद गावडे यांनी मदतकार्य केले.