33 लाखांचे नुकसान, ऑर्किड फुलांच्या रोपटय़ांसह विविध साहित्य जळाले
काणकोण : काणकोण तालुक्यात विविध ठिकाणी मिळून मागच्या दहा दिवसांत 25 पेक्षा अधिक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्या असून केरी-आगोंद येथील श्यामराव देसाई यांच्या पॉली हाऊसमध्ये लागलेल्या आगीत पॉली हाऊसचे सुमारे 33 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या आगीमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. देसाई यांनी 2016 साली बँकेकडून कर्ज घेऊन हे पॉली हाऊस उभारले होते. साधारणपणे 4 हजार चौ. मी. इतक्या क्षेत्रातील 250 चौ. मी. क्षेत्राचे पॉली हाऊस वाचविण्यात काणकोणच्या अग्निशामक दलाला यश आले असले, तरी त्यातील ऑर्किड फुल उत्पादनासाठी घातलेल्या बेड्स, जलवाहिनी, पाण्याचा पंप, ऑर्किडची रोपटी जळून गेली आहेत. या पॉली हाऊसमधील व्यवसाय कोरोना महामारीमुळे जवळजवळ दोन वर्षे ठप्प झाला होता. फुले कुजून गेली होती. त्यात 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले. कृषी खात्याकडे नुकसान भरपाईसाठी केलेल्या अर्जावर अजून विचार न झाल्यामुळे अद्याप नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. आताच कोठे हा व्यवसाय स्थिर होत असताना अकस्मात लागलेल्या आगीत होते नव्हते ते देखील गेले, अशी माहिती देसाई यांनी दिली. काणकोण मतदारसंघातील कित्येक जणांनी या व्यवसायात पदार्पण केले होते. त्यातील काही जणांवर पॉली हाऊस मोडीत काढून बरेचसे साहित्य भंगारात देण्याची पाळी आली आहे. या व्यवसायात उतरविण्यासाठी जो ठेकेदार आला होता त्याने पॉली हाऊस सुरू होण्याच्या अगोदरच रक्कम घेऊन पळ काढला आणि या व्यवसायात उतरलेल्यांवर आता लाखो रुपयांच्या कर्जांचा बोजा पडलेला आहे. या कर्जांचे हप्ते फेडण्यासाठी बँकेकडून तगादा लागलेला आहे.