सर्वच्या सर्व शंभर कामगार सुरक्षित : आगीत 1 कँटर ट्रक, 50 हून अधिक दुचाक्या खाक,अग्निशमन दलाची आगीशी झुंज उशिरापर्यंत सुरुच
प्रतिनिधी /म्हापसा
पिळर्ण-बार्देश येथील औद्योगिक वसाहतीमधील बर्जर बेकर या पेंटच्या खासगी कंपनीच्या प्लांटला काल मंगळवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून संपूर्ण प्लांट जळून खाक झाला. आगीत आतमधील पेंटच्या बॅरलांचा स्फोट होऊन आगीचे लोळ दूरवर पसरत होते. त्यामुळे एखादा बॉम्बस्फोटसदृष्ट चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे गावात तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या प्लांटमध्ये पेंटचा रासायनिक प्लांट असून त्याचा स्फोट झाल्यास अनर्थ घडू शकला असता. अग्निशामक दलाचे जवान आगीवर नियंत्रण ठेवून आहेत. आग विझविण्यासाठी फोमच्या बॅरलांचा वापर होत आहे, मात्र रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणणे जवानांना कठीण होऊन बसले होते.
यापूर्वी कुंडई येथेही बर्जर पेंट कंपनीच्या कारखान्याला आग लागून मोठे नुकसान झाले होते. याशिवाय या आगीचा फटका शेजारील कारखान्यांनाही बसला होता. आताही या प्लांटशेजारील कारखाने, आस्थापने असुरक्षित बनली आहेत. येथील 100 कर्मचारी, कामगार आणि इतर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. संपूर्ण परिसर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतला असून आग विझविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकरही स्वतः खास (हाय टर्न टेबल लेडरचा) शिडीचा वापर करीत सुमारे 50 मीटर उंचीवरून पाण्याचे फवारे मारून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नात होते.
सर्व कामगारांना बाहेर काढण्यात यश
आग लागली तेव्हा या प्लांटमध्ये 100 कामगार होते त्यांना प्रथम बाहेर काढण्यात आले. चारचाकी गाडय़ा त्वरित बाहेर काढण्यात यश मिळविले असले तरी अंदाजे 50 दुचाक्या आतमध्ये जळून खाक झाल्या. त्यात एक पेंट घेऊन आलेल्या मोठय़ा केंटर ट्रकचाही समावेश आहे.
रसायन टँकचा स्फोट न होण्यासाठी प्रयत्न
राज्यातील सर्व अग्निशमन दलातील बंब येथे आग नियंत्रणात आणण्यासाठी व आग अन्यत्र पसरू नये म्हणून धावपळ करताना पहायला मिळाले. अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन दलाचे शेकडो जवान शर्थीचे प्रयत्न आग विझविण्यास करीत आहेत. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नसली तरी प्लांटमधील मुख्य रासायनिक टँकचा स्फोट होऊ नये म्हणून तो टँक विझविण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्नात आहे. लष्कर दलातील बंबचीही मदत घेण्यात आली. शिवाय गरज भासल्यास हॅलिकॉप्टरचाही वापर करण्यात येईल अशी माहिती आमदार तथा औद्योगिक वसाहतीचे चेअरमन आलेक्स रेजिनाल्ड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आमदार केदार नाईक, अजय गोवेकर घटनास्थळी
दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आग नियंत्रणात येण्यास थोडा उशीर लागणार असल्याची माहिती आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिली. गावचे आमदार केदार नाईक, पिळर्णचे उपसरपंच अजय गोवेकर, माजी पंच करण गोवेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आग आटोक्यात येण्यास उशीर लागेल मात्र अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण ठेवून आहेत अशी माहिती आमदार केदार नाईक यांनी दिली.
बार्देशबरोबर पणजीहूनही दिसत होते धुराचे लोळ
ही आग इतकी मोठी होती की, आकाशातील धुराचे लोळ पणजी, म्हापसा, कळंगूट तसेच बार्देशात दिसून येत होते. दुपारी साडेतीन वाजता ही आग लागली. कंपनीत रंग बनवण्याचे काम सुरू होते. यासाठी अत्यंत रासायनिक पदार्थाचा वापर होतो. शिवाय पेंटने एकदा पेट घेतल्यानंतर तो जळून खाक होईपर्यंत ही आग सुरूच राहते. यावर पाण्याचे फवारेही निष्फळ ठरतात, अशी माहिती आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिली.
केंटर ट्रकमधून पेंट उतरवत असतानाच ही आग लागल्याने तो ट्रक जळून खाक झाला. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. यावेळी आयडीसाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, जिल्हाधिकारी मामू हेगे, आमदार केदार नाईक, उत्तर गोवा पोलीस निधीन वाल्सन घटनास्थळी उपस्थित होते.
आमदार रेजिनाल्डची बरीच धावपळ
गोवा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आलेक्स रेजनाल्ड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. ते स्वतः सर्वत्र धावपळ करीत अग्निशमन दलाचे बंब तसेच खासगी पाण्याचे टँकर ये-जा करण्यास धावपळ करीत होते. त्यांनी मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून नौदलच्याही बंबगाडय़ा मागवून घेतल्या. गरज भासल्यास हेलिकॉप्टरचाही वापर करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष रेजिस्ल्ड यांनी दिली.
लोकांनी मास्कचा वापर करावा : जिल्हाधकारी
आगीच्या धुरामुळे लोकांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो, म्हणून म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळ व इतर रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मामू हागे यांनी घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना दिली. नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आरोग्य खाते व इतर एजन्सीकडून अहवाल मागितला आहे. परिसरातील नागरिकांनी मास्कचा वापर करावा. आवश्यक सर्व काळजी घेतली जाईल. कुणीही अफवा पसरवू नये, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
आग नियंत्रणासाठी धावपळ करणाऱयांचे आभार : राजेश मल्होत्रा
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपड असलेल्या अग्निशमन दल, नौदल, प्रशासनातील अधिकारी, पोलीस व पत्रकारवर्ग यांचे बर्जर बेकर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मल्होत्रा यांनी आभार मानले. सुदैर्वाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे देवाचे उपकार आहे असे ते म्हणाले. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केलेल्या धावपळीचे त्यांनी आभार व्यक्त केले.
34 वर्षाच्या कालावधीत पहिलीच घटना : व्यवस्थापकीय मल्होत्रा
बर्जर बेकर पेंट बनविण्याचा प्लांट पिळर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये असून येथून देशभर पेंट पाठविला जातो, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मल्होत्रा यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. बर्जर व बेकर ही संयुक्त कंपनी आहे. बेकर ही स्वीडीश कंपनी आहे. आपण या व्यवसायात गेल्या 34 वर्षापासून असून अशी एवढी मोठी घटना प्रथमच पहायला मिळाली असल्याची माहिती मल्होत्रा यांनी दिली. 80 टक्के भागात रॉ मटेरियल होते. आग तेथूनच सुरुवात झाल्याचे ते म्हणाले.
पिळर्ण गावात सतर्कतेचा इशारा
पिळर्ण गावात आग पसरू नये म्हणून पाठीमागे जाऊन दोन बंबनी पाण्याचे फवारे मारून काजुच्या झाडाना सर्व पाण्याने ओले केले. या ठिकाणी बॅरलचे स्फोट होत असल्याने दलाच्या जवानांना बरीच धावपळ करावी लागली. खालील पिळर्ण भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला.
अस्थमा असलेल्यांनी काळजी घ्यावी : मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्री 8 वाजता घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि माहिती जाणून घेतली. अस्थमाचा त्रास कुणाला होत असल्यास त्यांना इतरत्र पाठविण्यासाठी सरकारने तयारी चालविली आहे. तसे कुणाला त्रास असल्यास त्यांनी त्वरित इस्पितळात धाव घ्यावी. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सर्व गोष्टीची तयारी ठेवली आहे. दमा असलेल्यांनी, लहान मुलांनी, वयोवृद्धांनी याची काळजी घ्यावी. मास्क लावून झोपू नये. सरकारकडून आगीची सखोल चौकशी केली जाईल. कार्बन मोनोऑक्साईड आग विझविल्यानंतर तयार होतो तो जीवीतास हानिकारक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आयडीसी पॅक्टरी अहवाल देणार आहे. या आगीची पूर्णतः सखोल चौकशीची आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आमदार केदार नाईक, आलेक्स रेजिनाल्ड आदी उपस्थित होते.