50 हजारांचे नुकसान : भरपाई देण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथे परसामध्ये साठवलेल्या गवतगंजीला मंगळवारी सकाळी आग लागून 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. गवतगंजीवरूनच विद्युततारा गेल्यामुळे शॉर्टसर्किटने आग लागली असून हेस्कॉम खात्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. गजानन कल्लाप्पा पाटील असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या घराच्या परसामध्ये तीन ट्रॅक्टर पिंजर, दोन ट्रॅक्टर कडबा साठविला होता. मंगळवारी सकाळी वाऱ्यामुळे विद्युततारा एकमेकांना घासून शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी उडाली आणि बघता बघता गवतगंजीने रौद्ररुप धारण केले. तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाऱ्यामुळे आग विझविणे कठीण झाले आणि सर्व गवतगंजी आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गजानन पाटील यांना लाखांचा फटका
या घटनेत गजानन पाटील यांचे 50 हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना परत गवत व कडबा विकत घेण्यासाठी 50 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे गजानन पाटील या शेतकऱ्याला 1 लाखाचा फटका बसला आहे. तेव्हा हेस्कॉम खात्याने त्यांना नुकसानभरपाई मंजूर करून देण्याची मागणी करण्यात आली. घटनास्थळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, तानाजी पाटील यांनी पाहणी केली.