म्यानमारमधील क्रूर घटना ः 7 विद्यार्थ्यांसह 13 जणांचा मृत्यू
@ वृत्तसंस्था / यंगून
म्यानमारमध्ये सैन्याच्या हेलिकॉप्टरने एका शाळेवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 13 जणांना जीव गमवावा लागला असून मृतांमध्ये 7 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही शाळा एका बौद्ध मठात चालविली जात होती. गोळीबारात 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सागैंग भागातील शाळेत सैन्याने हल्ला केला आहे. या शाळेत बंडखोर लपून होते असे सैन्याचे सांगणे आहे.
प्रथम बंडखोरांनी गोळीबार सुरू केला होता, याला प्रत्युत्तर देण्यात आल्याचा दावा सैन्याकडून करण्यात येत आहे. मुलांना सुरक्षितस्थळी हलविण्याचा प्रयत्न सुरू असताना एमआय-35 हेलिकॉप्टर्समधून गोळीबार सुरू करण्यात आला. शाळेवर मशीनगन आणि मोठय़ा शस्त्रास्त्रांनी गोळीबार करण्यात आल्याचे शाळेच्या प्रशासकाकडून सांगण्यात आले.
किमान 30 विद्यार्थ्यांना गोळी लागली असल्याचे त्यांनी सांगितले. पीपल्स डिफेनस फोर्सचे सदस्य लपल्याची माहिती मिळाल्यावर सैन्याचे पथक तेथे पोहोचले होते. म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यापासून सैन्याच्या कारवाईत सर्वसामान्य नागरिक मारले जात आहेत. एक वर्षात सुमारे 2 हजार लोक मारले गेले आहेत. तर 12 हजार जणांना सैन्याकडून ताब्यात घेण्यात आले आहे.