प्रतिनिधी/ सातारा
मोर्वावाघोशी रोडवर भादे गावच्या हद्दीत मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे यांच्या वाहनावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यावेळी कोंडे यांच्या अंगरक्षकाने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी दीडच्या सुमारास घडली. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबानाथ आणि मोर्वेचे श्री दत्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसाद कोंडे आपल्या चारचाकी वाहनातून (एमयू 12 यूजी 999) मोर्वेकडून वाघोशी मार्गे लोणंदकडे निघाले होते. यावेळी वडझलवाडी फाटय़ाजवळ भादे गावच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोंडे यांच्या वाहनावर पिस्तुलमधून दोन फायर केले. त्यानंतर कोंडे यांच्या अंगरक्षकाने प्रत्युत्तरादाखल हल्लेखोरांच्या दिशेने दोन फायर केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले.
या घटनेची माहिती लोणंद व खंडाळा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सपोनि विशाल वायकर, पीएसआय देसाई, मोरे आपल्या सहकाऱयासमवेत घटनास्थळी दाखल झाले. कोंडे यांच्या गाडीवर कोणी व का? गोळीबार केला, याचा पोलीस तपास करत आहेत.