वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठय़ा प्रमाणावर उसळलेल्या हिंसाचारासंबंधी पहिला गुन्हा सीबीआयने दाखल केला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या हिंसाचाराची चौकशी करण्याचा अधिकार सीबीआयकडे दिल्यानंतर या केंद्रीय तपास यंत्रणेने हा तपास हाती घेतला.
23 मे 2021 या दिवशी प्रसेनजित दास या नावाच्या भाजप कार्यकर्त्याचा देह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या आईच्या समोरच त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप आहे. ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि दहशतवादी शक्तींनी विजयोन्मादात घडविली, असाही आरोप आहे.
सीबीआयने या प्रकरणी तक्रार नोंदविल्यानंतर तपास सुरू केला. बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. ही तक्रार प्रसेनजित दास यांच्या मातेने सादर केली असून पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे. हत्या झाल्यानंतर प्रसेनजित यांचा मृतदेह सक्तीने सरकारी अधिकाऱयांनी हिरावून नेला होता. मृतदेहाची उत्तरीय तपासणी कुटुंबीयांच्या अनुमतीशिवाय झाली होती. ही तपासणी संशयाच्या भोवऱयात आहे. राज्य सरकारच्या पोलीस अधिकाऱयांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला होता. यामुळे प्रसेनजित यांच्या मातेने पोलिसांवरही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना भीती दाखवित असल्याचा आरोपही अनेक भाजप कार्यकर्त्यांनी केला होता.