वृत्तसंस्था/ बेलग्रेड (सर्बिया)
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या 2022 च्या विश्व कुस्ती स्पर्धेतील पहिला दिवस भारतीय मल्लांना अपयशी ठरला. ग्रीको रोमन पद्धतीमध्ये भारताच्या सुनीलकुमारसह अन्य चार मल्लांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.
या स्पर्धेतील शनिवारी ग्रीको रोमन प्रकारामध्ये 87 किलो वजन गटातील झालेल्या सलामीच्या लढतीत भारताच्या सुनीलकुमारला तुर्कीच्या अली सेनगिझकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीतील ही लढत 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. पण तुर्कीच्या मल्लाने शेवटचा गुण जिंकल्याने त्याला पंचांनी विजयी म्हणून घोषित केले.
55 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत अमरिकेच्या मॅक्स नोवेरीने भारताच्या आशियाई स्पर्धेतील कास्यपदक विजेत्या अर्जुन हेलाकुर्कीचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून पुढील फेरी गाठली. पुरुषांच्या 72 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या सामन्यात माजी युरोपियन चॅम्पियन शेमागी बोलकेवेजने भारताच्या विकासचा 2-1 असा पराभव केला. विकासने 2017 च्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. पुरुषांच्या 77 किलो वजन गटातील सलामीच्या लढतीत उझ्बेकचा मल्ल तसेच विश्व कुस्ती स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता ऍरेम व्हेर्डानेनने भारताच्या सचीनचा 8-0 असा पराभव केला.
आता या स्पर्धेत रविवारी भारताचे ग्रीको रोमन पद्धतीत सहभागी होणारे मल्ल नीरज, आशू आणि दीपांशू यांच्या सलामीच्या लढती होत आहे. बेलग्रेडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 31 मल्लांचे भारतीय पथक सहभागी झाले आहे. ही स्पर्धा 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान होत आहे. या स्पर्धेत भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते मल्ल बजरंग पुनिया, रविकुमार दाहिया तसेच महिलांच्या विभागात विनेश फोगट हे सुवर्णपदक मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र दुखापतीमुळे या महत्त्वाच्या स्पर्धेत भारताच्या दीपक पुनिया आणि अनशु मलिक यांना माघार घ्यावी लागली आहे.