मुंबई ते अहमदाबाद मार्गावर पहिली फेरी ः ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दाखवला हिरवा झेंडा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवलेली विमान कंपनी अकासा एअरचे पहिले विमान रविवारी सकाळी 10.05 वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी निघाले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या पहिल्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवला. हे विमान अहमदाबादला 11.25 वाजता पोहोचले. पूर्ण बुक केलेल्या फ्लाईटमध्ये 189 प्रवासी तसेच कॉकपिट आणि केबिन क्रू यांचा समावेश होता.
आता अकासा एअरलाईन 13 ऑगस्टपासून बेंगळूर-कोची मार्गावर, 19 ऑगस्टपासून बेंगळूर-मुंबई आणि 15 सप्टेंबरपासून चेन्नई-मुंबई मार्गावर सेवा सुरू करणार आहे. फ्लाईटचे किमान भाडे 1,916 रुपये आहे. अकासाने कमी किमतीची एअरलाईन म्हणून स्वतःला प्रक्षेपित केल्यामुळे स्पाईसजेट, इंडिगो, गोफर्स्ट सारख्या कंपन्यांना थेट स्पर्धा मिळेल. झुनझुनवाला यांनी या उपक्रमातील 40 टक्के हिस्सेदारीसाठी 35 दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक केली आहे.
अकासा एअरची मुंबई ते अहमदाबाद फेरी बुधवार वगळता दररोज चालेल. त्याची मुंबईहून सुटण्याची वेळ सकाळी 10ः05 आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादहून परतीचे विमान बुधवार वगळता दररोज दुपारी 12.05 वाजता निघणार आहे. मुंबईहून फ्लाईटचे तिकीट 2,673 रुपयांपासून सुरू होते, तर अहमदाबादहून फ्लाईटचे तिकीट 2,574 रुपयांपासून सुरू होते. मुंबई ते अहमदाबाद दुसरे फ्लाईट दुपारी 02.05 वाजता उड्डाण करेल. तर अहमदाबादहून परतीचे फ्लाईट संध्याकाळी 4ः05 वाजता असणार आहे.
2023 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे
अकासा एअरलाईन्स 2023 च्या उन्हाळय़ात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणार आहे. येत्या वर्षभरात कंपनीकडे 20 विमानांचा समावेश असणार आहे. कंपनीकडे मध्य-पूर्व, आग्नेय आशिया, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथे उड्डाण करण्याचा पर्याय असेल. या सेवांविषयी येत्या काही महिन्यांमध्ये नियोजन केले जाणार आहे.