अंतिम फेरीत कुवैतवर मात, महिला संघाला कांस्यपदक
वृत्तसंस्था/ चेआँगजू, द.कोरिया
भारताच्या पुरुष संघाने आशियाई स्क्वॅश सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून दिले. येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने कुवैतचा 2-0 असा पराभव केला. महिला संघाला मात्र उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदक मिळाले.
भारताचा अनुभवी स्टार स्क्वॅशपटू सौरव घोषालने दुसरा सामना जिंकून देत भारताचे जेतेपद निश्चित केले. त्याआधी रमित टंडनने अली अरामेझीवर 11-5, 11-7, 11-4 अशी मात करीत भारताला कुवैतवर आघाडी मिळवून दिली होती. दुसऱया सामन्यात घोषालने अम्मार अल्तामिमीचा 11-9, 11-2, 11-3 असा एकतर्फी धुव्वा उडवित भारताला विजयी आघाडी मिळवून दिली. भारताचे जेतेपद निश्चित झाल्याने अभय सिंग व फलाह मोहम्मद यांच्यातील तिसरा सामना खेळविण्यात आला नाही.
यापूर्वी भारताच्या पुरुष संघाला दोन वेळा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी त्यांना पहिले मानांकन देण्यात आले होते आणि या मानांकनाला साजेसा खेळ करीत जेतेपदही पटकावले. गट अ मध्ये भारताने सर्व लढती जिंकत अग्रस्थान मिळविताना कतार, पाकिस्तान, कुवैत, दक्षिण कोरिया, चिनी तैपेई यांच्यावर 3-0 असे विजय मिळविले तर उपांत्य फेरीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करीत अंतिम फेरी गाठली होती.
भारताच्या महिला संघाला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत महिला संघाला मलेशियाकडून 1-2 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी गट ब मध्ये भारतीय महिला संघाने दुसरे स्थान मिळविताना दोन विजय व एक पराभव स्वीकारला. महिला संघाने इराण, सिंगापूर यांच्यावर 3-0 अशी मात केली तर हाँगकाँगकडून त्यांना 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला.