Tarun Bharat

भारत-झिम्बाब्वे यांच्यात पहिली वनडे आज

Advertisements

नियमित कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक द्रविडच्या गैरहजेरीत केएल राहुल अँड कंपनीवर मुख्य धुरा

हरारे / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट संघ आज (गुरुवार दि. 18) झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वनडेसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी हंगामी कर्णधार केएल राहुलचा फॉर्म व फिटनेस मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. वनडे क्रिकेटच्या लोकप्रियतेला अलीकडे प्रचंड ओहोटी लागली असून अगदी ओळख टिकवून ठेवण्यासाठी या क्रिकेट प्रकाराला झगडावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर, लौकिक कायम राखण्यासाठी या छोटेखानी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. आज उभय संघातील पहिल्या वनडेला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल.

टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आश्वासक खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱया केएल राहुलचे योगदान यावेळी विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. येथे सलामीला उतरण्याची संधी मिळत असल्याने केएल राहुलने शक्य तितका वेळ क्रीझवर टिकून राहणे अपेक्षित असेल.

केएल राहुलला यापूर्वी स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली असून यामुळे तो जवळपास अडीच महिने मैदानाबाहेर होता. आता झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिकेत प्रभावी पुनरागमन साकारत टी-20 क्रिकेटमधील आघाडीची जागा सुनिश्चित करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

नियमित कर्णधार रोहित शर्मा असो किंवा प्रशिक्षक राहुल द्रविड, ते या मालिकेत केएल राहुल किती धावा करतो, हे पाहणार नाहीत. पण, त्याच्या एकंदरीत फॉर्मकडे व पदतालित्याकडे त्यांचे लक्ष केंद्रित असणार आहे. केएल राहुल या मालिकेत ज्या तडफेने फलंदाजी करेल, त्यावर त्याला आगामी आशिया चषक स्पर्धेत दि. 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱया ‘मदर ऑफ ऑल बॅटल्स’ लढतीत स्थान असेल का, हे निश्चित होईल.

येथील हरारे स्पोर्ट्स क्लबवरील फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर झिम्बाब्वेने अलीकडेच बांगलादेशविरुद्ध संपन्न झालेल्या मालिकेत लागोपाठ दोन सामन्यात 300 हून अधिक व 290 धावांच्या आसपासचे टार्गेट सहज पार केले होते. केएल राहुल, शिखर धवन, शुभमन गिल, दीपक हुडा व संजू सॅमसन हे दिग्गज फलंदाज मात्र झिम्बाब्वेच्या तुलनेने अननुभवी गोलंदाजांसाठी मोठे आव्हान उभे करत असतील तर यात आश्चर्याचे कारण नसेल. शिवाय, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, कुलदीप यादव, अष्टपैलू शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल हे गोलंदाज झिम्बाब्वेच्या फलंदाजी लाईनअपला मोठे सुरुंग लावण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहेत.

यापूर्वी, बांगलादेशविरुद्ध मालिकेत सिकंदर रझा, चकबवा व इनोसन्ट काईया यांनी विजयश्री खेचून आणण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आता भारताविरुद्ध मालिकेतही त्यांच्याकडून स्थानिक व्यवस्थापनाला हीच अपेक्षा असेल.

दीपक चहरचे पुनरागमन

या मालिकेच्या माध्यमातून दीपक चहर व कुलदीप यादव यांना मिळालेली संधी महत्त्वाची असेल. दीपक चहर 6 महिन्यानंतर संघात परतत असून कुलदीप यादव  हरवलेला सूर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिला आहे. भुवनेश्वरने टी-20 सेटअपमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, चहर पॉवर प्ले षटकात स्विंग गोलंदाजी व डेथ ओव्हर्समध्ये जोरदार फटकेबाजी करण्यात माहीर असल्याने भुवीऐवजी त्याला स्थान लाभू शकते. तूर्तास, त्याचा आशिया चषक स्पर्धेसाठी राखीव खेळाडूत समावेश आहे.

महाराष्ट्राचा राहुल त्रिपाठी या मालिकेत मधल्या फळीत उतरु शकतो. हंगामी प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण त्याला शार्दुल ठाकुरऐवजी खेळवणार का, हे मालिकेत निश्चित होईल. भारतीय संघ मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप नोंदवणे अपेक्षित आहे. मात्र, एखाद-दुसऱया दिवशी पलटवार करता येईल का, हेच झिम्बाब्वेचा संघ हेरत असणार आहे.

संभाव्य संघ

भारत ः केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.

झिम्बाब्वे ः रेगिस चकबवा (कर्णधार), रियान बर्ल, तनाका चिवंगा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जाँग्वे, इनोसन्ट काईया, टॅकूवॅनशे कैतानो, क्लाईव्ह मॅदन्डे, वेस्ले मेधेव्हेरे, तदिवन्शे मरुमनी, जॉन मसारा, टोनी मुन्योगा, रिचर्ड नॅग्रव्हा, व्हिक्टर न्ययूची, सिकंदर रझा, मिल्टॉन शुम्बा, डोनाल्ड तिरिपॅनो.

सामन्याची वेळ ः दुपारी 12.45 वा.

थेट प्रसारण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

उरलीसुरली ताकदही संपुष्टात, ही झिम्बाब्वेची मुख्य डोकेदुखी

अँडी व ग्रँड हे फ्लॉवर बंधू, हिथ स्ट्रीक, नील जॉन्सन, मरे गुडविन्स व हेन्री ओलांगासारखे खेळाडू एकेकाळी झिम्बाब्वे क्रिकेटला एका उंचीवर नेण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरले होते. मात्र, मागील दोन दशकात झिम्बाब्वे क्रिकेटचा दर्जा बराच घसरला आहे. 36 वर्षीय सिकंदर रझा, 34 वर्षीय कर्णधार चकबवा किंवा 34 वर्षीय डोनाल्ड तिरिपानो लक्षवेधी योगदान देऊ शकतात. मात्र, भारतासारख्या कडव्या संघाला ते कितपत आव्हान देऊ शकणार, हे आज प्रत्यक्ष लढतीत स्पष्ट होऊ शकेल.

झिम्बाब्वेला खुणावतेय ‘ते’ एकच लक्ष्य!

तसे पाहता, झिम्बाब्वेविरुद्ध 3 सामन्यांची ही मालिका जिंकून भारताला फारसे काही साध्य होणार नाही. मात्र, उलटपक्षी ही मालिका गमवावी लागली तर मात्र भारताला प्रचंड टीकेला, रोषाला सामोरे जावे लागेल. हीच बाब हेरत झिम्बाब्वेचा संघ भारताला कोंडीत पकडता येईल का, याची चाचपणी करताना दिसून येणे अपेक्षित आहे.

हा तर मोठय़ा भावाचा छोटय़ा भावाला आर्थिक मदतीचा हात!

झिम्बाब्वे क्रिकेटचा 6 महिन्यांचा खर्च भरुन निघणार!

भारतीय क्रिकेट संघाने आपल्या भरगच्च कार्यक्रमात झिम्बाब्वे दौऱयावर जात तिथे 3 वनडे खेळणे हे त्यांच्याकडून झिम्बाब्वे क्रिकेटसाठी एक प्रकारचे बक्षीस असणार आहे. भारताविरुद्ध 3 सामन्यांच्या या मालिकेत टीव्ही आणि डीजिटल राईट्समधून मिळणारे उत्पन्न झिम्बाब्वे क्रिकेटच्या 6 महिन्यांच्या खर्चापेक्षा अधिक असेल! दुसरीकडे, भारतीय संघाला या मालिकेच्या माध्यमातून आपले अन्य खेळाडू आजमावून घेता येईल, जेणेकरुन 2023 वनडे विश्वचषक संघाची जडणघडण निश्चित करणे शक्य होईल.

हंगामी कर्णधार केएल राहुलचा कसून सराव

झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वनडेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हंगामी कर्णधार केएल राहुलने कसून सराव केला. केएल राहुल दुखापतीमुळे प्रदीर्घ काळ बाहेर रहावे लागल्यानंतर या मालिकेच्या माध्यमातून पुनरागमन करत आहे. त्याने सराव सत्रातील काही छायाचित्रे कू ऍपवर शेअर केली. उपकर्णधार शिखर धवनने 9 वर्षांनंतर झिम्बाब्वेत खेळत असताना प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखता कामा नये, असे म्हटले आहे.

भारत-झिम्बाब्वे वनडे मालिकेची रुपरेषा

तारीख / लढत / भारतीय प्रमाणवेळ / ठिकाण

18 ऑगस्ट / पहिली वनडे / दु. 12.45 वा. / हरारे

20 ऑगस्ट / दुसरी वनडे / दु. 12.45 वा. / हरारे

22 ऑगस्ट / तिसरी वनडे / दु. 12.45 वा. / हरारे

Related Stories

गोफीन पराभूत तर डिमिट्रोव्ह विजयी

Patil_p

पाच फुटबॉल क्लब्सना परवाना मिळविण्यात अपयश

Patil_p

भारत- हाँगकाँग फुटबॉल सामना आज

Patil_p

मिताली राज मानांकनात पहिल्या पाच खेळाडूत

Patil_p

आयपीएलसाठी 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा ‘मिनी’ लिलाव

Patil_p

माझ्यात फारसे क्रिकेट राहिलेले नाही!

Omkar B
error: Content is protected !!