नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा : फोंडा पालीकेच्या प्रशासकीय इमारत विस्तारीकरण प्रकल्प पायाभरणी सोहळा –राज्यातील प्रभाग व मालमत्तेचे जीआय मॅपिंग–फोंडा उपजिल्हा इस्पितळाला सिटी स्कॅन मशिन मागणी
प्रतिनिधी / फोंडा
पणजी स्मार्टसिटीची स्वप्नपुर्तीनंतर राज्यातील मध्यावर्ती असलेल्या फोंडा तालुक्याला नाविन्याचा साज चढवित ‘फोंडा शहर-स्मार्ट सिटी’ करण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी प्रभागचे सर्वेक्षण (जीआयएस मॅपिंग) भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे होणार आहे. फोंडय़ासाठी मास्टरप्लान तयार असून नागरिक व नगरसेवकांच्या सुचना ऐकून घेतल्यानंतर जीसुडामार्फत त्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल. जेणेकरून गोल्डन ज्युबिलीसारख्या प्रलंबित कामानाही चालना देण्यात येईल अशी घोषणा नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी केली.
फोंडा नगरपालीकेच्या प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीत प्रकल्प उभारणी कामाचा पायाभरणी सोहळय़ा ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. काल गुरूवारी दुपारी हा सोहळा पार पाडला. यावेळी कृषी मंत्री रवी नाईक, फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, उपनगराध्यक्ष अर्चना डांगी, पालीकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी, नगरसेवक उपस्थित होते.
फोंडा उपजिल्हा ईस्पितळाला सिटी स्कॅनची मागणी
यावेळी बोलताना कृषी मंत्री रवी नाईक म्हणाले की फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात सीटी स्कॅन नसल्यामुळे रूग्णांना व आपत्कालीन अपघातातील जखमीना मडगांव व बांबोळी येथे पाठविण्यात येते. फोंडय़ाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. फेंडय़ात होणाऱया वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुचविताना श्री झरेश्वर मंदिराजवळून खडपाबांधमार्गे ढवळी-फर्मागुडी मार्गाला जोडणारा ‘सिटी बायपास’ हे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावा, सदर मार्ग फोंडा ओडीपीतही रेखांकीत आलेला असल्याची माहिती त्यानी यावेळी बोलताना दिली.
जीसुडामार्फत फोंडय़ाचा कायापालट करणार
फोंडयातील जनतेला उत्तम वैद्यकीय सेवा, पाणी व रस्ते देण्यासाठी आपले प्रयत्न राहिलेले आहे. विस्तारीकरणाचा प्रकल्प रू. 2.17 कोटी खर्चुन उभारण्यात येत असून सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याशिवाय विर्स्तीण जागेत् वाहनांची पार्किगची सोय करण्यात आलेली आहे. सद्यपरिस्थितीत फोंडा मतदारसंघात मंत्री रवी नाईक व नगरसेवक रितेश नाईक यांच्या कार्यकाळात गोल्डन ज्युबिली प्रकल्प, शास्त्री मॉल, मार्केट प्रकल्पाला जोडून, खुले भाजी मार्केट, मासळी मार्केट असे लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लागत आहे.
विस्तारीत प्रकल्पासाठी 2.17 कोटी खर्च
नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करताना फोंडा पालीकेतर्फे होऊ घातलेल्या संपुर्ण कामाचा आढावा घेतला. फोंडा पालीका इमारतीचा विस्तारीत प्रकल्पासाठी सुमारे रू. 2 कोटी 17 लाख खर्चुन उभारणी करण्यात येणार आहे. गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी फंड तसेच चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या फंडातून सदर काम हाती घेण्यात येणार आहे. फोंडा तालुक्यातील वाढती लाकसंख्या व बदलते स्वरूपामुळे विस्ताराची गरज होती ती आज पुर्ण होत असल्याने रितेश नाईक यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.
फोंडा पालीकेची पोर्तुगीजकालीन मूळ वास्तू वारसा हक्क म्हणून जशास तशी ठेवण्यात येणार आहे. विस्तारीत प्रकल्पाचा शिलान्यास त्यानंतर नविन वास्तूच्या पायाभरणी नामफलकाचे अनावरण नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर दिपप्रज्वलनाने सोहळय़ाची सुरूवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रघुनाथ साकोर्डेकर यांनी केले. मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांनी आभार मानले. सोहळयाला फेंडा पालीका क्षेत्रातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.