मांसविक्री दुकानांतील कचऱयाची विक्री सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील मांसविक्री दुकानांतील कचरा महापालिकेच्यावतीने जमा केला जात होता. मात्र यापुढे खासगी कंत्राटदाराकडून कचऱयाची उचल केली जाणार आहे. येत्या चार दिवसांत याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय डूमगोळ यांनी दिली.
घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा जमा केला जातो. मात्र मांसविक्री व्यावसायिकांकडील कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिकेने दोन वाहनांची व्यवस्था केली आहे. या कचऱयाची विल्हेवाट तुरमुरी डेपोमध्ये लावली जाते. कचरा जमा करून प्रक्रिया करण्यासाठी मांसविक्री व्यावसायिकांकडून प्रत्येक महिन्याला शुल्क आकारणी करण्यात येते. मात्र कचऱयाची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावण्याची सूचना हरितलवादाने केली आहे. त्यामुळे मांस व्यावसायिकांकडील कचऱयाची उचल करण्यासाठी खासगी कंत्राटदार पुढे आले आहेत. मत्स्यपालन करणाऱयांना खाद्यांची आवश्यकता असते. हे खाद्य चिकन, मटण या माध्यमातून तयार करण्यात येते. मत्स्यखाद्य निर्माण करण्यासाठी चिकन आणि मटणविक्री दुकानांतील कचरा घेतला जाणार आहे. याकरिता महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही.
मांसविक्री दुकानांतील कचरा जमा करण्यासाठी आठ कर्मचारी आणि दोन वाहनांची नियुक्ती केली आहे. याकरिता खर्च करावा लागतो. पण खासगी कंत्राटदाराकडे मांसविक्री दुकानांतील कचऱयाची उचल करण्याची जबाबदारी देण्यात आल्याने केला जाणारा खर्च वाचणार आहे. हा कचरा जमा करण्यासाठी कंत्राटदाराने चार वाहनांची व्यवस्था केली असून प्रयोगिक तत्त्वावर कचरा उचल करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच ऑटोनगर येथे मांसपासून मत्स्यखाद्य तयार करण्याचा प्रकल्प बनविण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे मांसविक्री दुकानांतील कचऱयाची उचल खासगी कंत्राटदारांकरवी केली जाणार आहे. याकरिता शहरातील मांसविपेत्यांना डस्टबिनचे वितरण करण्यात येत आहे.