सर्वजण आमदार केदार नाईक यांच्या पॅनलचे, पूर्ण पॅनल निवडून आणण्याचा इरादा
प्रतिनिधी /म्हापसा
रेईसमागूस पंचायतीमधून आपल्या पॅनलमधील 5 पंच सदस्य बिनविरोध निवडून आले. इतर पाच वॉर्डात निवडणुका होणार असून या पंचायतीमधून आपले सर्व पॅनल निवडून येणार आहे. 10 पैकी 5 उमेदवार बिनविरोध निवडून या पंचायतीत आम्ही यंदा विक्रम केल्याची माहिती साळगावचे आमदार केदार नाईक यांनी बेती येथे आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
पाच उमेदवारांची पंच सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. आमदार केदार नाईक यांनी या पाचही उमेदवारांचे अभिनंदन केले. या पाच पंच सदस्यांमध्ये झेवियर रिबेरो-वॉर्ड 1, उमेश मयेकर- वॉर्ड 3, सुभाष पेडणेकर- वॉर्ड 4, संजीत भोसले-वॉर्ड 9 व नैना जयप्रकाश नाईक-वॉर्ड 10 यांचा समावेश आहे. निवडणूक होण्यापूर्वी एकाच पंचायतीमधून 5 उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा मान आमदार केदार नाईक यांना मिळाला आहे. आपल्या पंचायतीमधून सर्व उमेदवार निवडून येणार येतील. या पंचायीतवर सरपंचपद महिलांसाठी राखीव असून त्यासाठी आमदार नाईक यांनी सुस्मिता सुभाष पेडणेकर यांचे नाव जाहीर केले आहे.
लोकांची कामे होत असतात. गावच्या समस्या पंच सदस्य सोडवितात तेव्हाच त्यांना एक प्रकारची खात्री पडते व ते त्या पंचाला निवडून आणतात. अशी माहिती आमदारांनी दिली. ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. पॅनलमुळे गावात कामेही त्वरित होतील. प्रार्थना गारुडी, फ्रान्सिस शेर्राव यांनी आपला अर्ज मागे घेऊन आम्हाला पाठिंबा दिला, असे ते म्हणाले.
केलेल्या कामाची पोचपावती : सुभाष पेडणेकर
आपण बिनविरोध निवडून आलो आहे. आपली ही सलग तिसरी वेळ आहे. गावात कामे केल्यास ग्रामस्थ आमच्या पाठीशी राहतात. आपण कधीच विकास कामाबाबत भेदभाव केला नाही. त्या बळावर जनतेने आपल्यास कौल दिला असल्याची माहिती सुभाष पेडणेकर यांनी दिली.
ग्रामस्थांच्या सर्व समस्या सोडविण्याकडे लक्ष पुरविणार- नैना नाईक
आमदार केदार नाईक यांच्या आई नैना नाईक म्हणाल्या, आपल्यास पूर्वीपासूनच समाजसेवा करण्याची आवड होती. आता इतक्या वर्षांनी मुलामुळे आणि ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज पंच झाले. ग्रामस्थांच्या सर्व समस्या सोडवू असेही त्या म्हणाल्या. केदार नाईक म्हणाले, आपले आजोबा सूर्यकांत व आजी रजनी स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच वडील जयप्रकाशही स्वा. सैनिक होते. आपले घराणेच त्यात रमले होते. पूर्वीपासून आजीने पंच सदस्य म्हणून काम केले होते. हे आमच्या रक्तातच असून ती परंपरा आम्ही आमदार पुढे घेऊन जात आहे. हे करीत असताना आज आम्हाला सुभाष पेडणेकर, विरेंद्र शिरोडकर, सुश्मिता पेडणेकर आदी सर्व पंच सदस्यांची साथ लाभली. विधानसभा निवडणुकीतही आम्हाला भरघोस मते दिली. यापुढेही समाजासाठी व साळगावसाठी भरघोस विकास करून आम्ही पुढील तयारी करू असे ते म्हणाले. यावेळी पंच संजीता भोसले, झेवियर रिबेरो, उमेश मयेकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
मुलगा आमदार तर आई पंच सदस्या, वेरे रेईस मागूसमध्ये नवा विक्रम
आपली आई नैना नाईक यांना पूर्वीपासूनच समाज सेवेची ओढ होती. आमचे मुळ घर बेती येथे होते. तिथे आपल्या जीवनात खूप समाजसेवा केलेली आहे. तिला उत्साह होताच तिचे जे स्वप्न होते ते आपण आमदार बनून पूर्ण केलेच. आणि आज आपल्यामुळे ती बिनविरोध पंच सदस्यही बनली असल्याची माहिती आमदार केदार नाईक यांनी दिली. आपल्या हातानी ती आता गावच्या विकासाकडे आपल्याबरोबर भर देणार असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.