वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
थायलंडमध्ये सुरू असलेल्या 2022 च्या आशियाई 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटाच्या पुरुष आणि महिलांच्या कनि÷ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी आपली पाच पदके निश्चित केली आहेत. भारताच्या उन्नती हुडा, ज्ञाना दत्तू, अनिश थोपानी यांच्यासह दुहेरीतील भारताच्या दोन जोडय़ांनी उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. भारताच्या अर्श मोहम्मद आणि संस्कार सारस्वत त्याचप्रमाणे बिजॉर्न जेसन व पी. व्ही. श्रीनिवास यांनी दुहेरीची उपांत्यफेरी गाठली आहे.
2018 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने 5 पदकांची कमाई केली होती. तर 2019 च्या या स्पर्धेत भारताला केवळ 2 पदकांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी या स्पर्धेत भारताची चौथी मानांकित महिला बॅडमिंटनपटू उन्नती हुडाने एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किमचा 21-15, 21-18 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. आता टॉप सीडेड उन्नती आणि जपानची योकोयुची यांच्यात उपांत्य लढत होणार आहे.
15 वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सातव्या मानांकित दत्तूने चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या वर्धानाचा 21-11, 13-21, 21-11 तर भारताच्या अनिशने इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित रुमोनडोरवर 22-20, 19-21, 21-12 अशी मात करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. पुरुषांच्या 17 वर्षाखालील वयोगटातील दुहेरीच्या सामन्यात भारताच्या अर्श आणि संस्कार या जोडीने इंडोनेशियाच्या नेवाफ आणि ऍड्रिल यांचा 24-22, 20-22, 21-15 तसेच दुसऱया एका सामन्यात भारताच्या बिजॉर्न आणि आतिष या जोडीने चीन तैपेईच्या लिन आणि तेसाई यांचा 16-21, 21-12, 21-17 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. भारताच्या मयांक राणा आणि जिया रावत यांचे महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले.