हणजूण पोलिसांची कारवाई : दोघे जखमी एकाची स्थिती गंभीर
प्रतिनिधी /म्हापसा
आंसगाव येथे एका बांधकामाच्या ठिकाणी एसी टेक्निशियन म्हणून काम करणाऱया सोहेल सलीम शेख आणि वाशीम शेख (वडाळा-मुंबई) यांना त्याच ठिकाणी काम करणाऱया बिहारी कामगारांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 327 तसेच 307 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आंसगाव येथे नव्यानेच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी रविवारीच कामावर रुजू झालेल्या वडाळा-मुंबई येथील सलीम शेख तसेच वाशीम शेख हे दोघेही आपल्या कामात व्यस्त असताना, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दीपक पासवान, रोशन पासवान, दिश्कांत पासवान, किशन पासवान तसेच सुमीतकुमार साह (सर्व जण बेगुसराय-बिहार) या सर्वांनी त्या दोघांवर क्षुल्लक कारणांवरून हल्ला केला. यावेळी, तक्रारदार सलीम शेख याने त्यांच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून घेत तेथून पळ काढला मात्र त्यांच्या हाती सापडलेल्या वाशीम शेख याला संशयित पाचही कामगारांनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी वाशीम याच्यावर बांबोळीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या संबंधात हणजूण पोलिसांनी अटक केलेल्या बिहारी कामगारांच्या विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, म्हापसा पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलिस निरीक्षक प्रशल देसाई व उपनिरीक्षक धिरज देविदास अधिक तपास करीत आहेत.