ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुणे जिल्ह्यात निवडणूक लागलेल्या 221 पैकी 45 ग्रामंपचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे 176 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामधील 5 ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी कोणीही अर्ज केला नव्हता. त्यामुळे ही 5 सरपंचपदे रिक्त राहणार आहेत. तसेच सदस्यपदाच्याही 79 जागांसाठीही अर्ज आले नसल्याने या जागाही रिक्त राहतील. या सर्व जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
सरपंचपदासाठी अर्ज न आलेल्या गावांमध्ये भोर तालुक्यातील 2 गावे, दौडमधील 1, जुन्नरमधील 1 गाव आणि मुळशीमधील एका गावाचा समावेश आहे. तर भोरमधील 22, वेल्हा तालुक्यातील 18, जुन्नरमधील 16, मुळशीमधील 11, आंबेगावमधील 8, खेडमधील 2, दौडमधील 1 आणि मावळमधील एका ग्रा मपंचायत सदस्याचे पद रिक्त आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्रात गारठा आणखी वाढणार
दरम्यान, बिनविरोध झालेल्या 45 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला होता. काँग्रेसने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. तर भाजपला केवळ एकच बिनविरोध जागा जिंकता आली होती. त्यामुळे 176 ग्रामपंचायतींच्या मतदानात चुरस पाहायला मिळाली. 176 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या 1 हजार 62 जागांसाठी 3 हजार 313 उमेदवार रिंगणात होते. तर सरपंचपदाच्या 167 जागांसाठी 519 उमेदवार रिंगणात होते. या जागांसाठी रविवारी 80.79 टक्के मतदान झाले होते. आज दुपारपर्यंत या निवडणुकीच्या निकालाचे सर्व चित्र स्पष्ट होईल.