ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईतील पंचतारांकित ललित हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी अज्ञाताने फोनवरुन ही धमकी दिली. या धमकीनंतर हॉटेल परिसरात खळबळ उडाली असून, हॉटेलची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञाताने हॉटेलमध्ये फोन केला. फोन केलेल्या व्यक्तीने हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. तसेच पाच कोटींची खंडणी मागितली. खंडणी न मिळाल्यास हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, बॉम्बशोधक पथकाने हॉटेलची झडती घेतली असता कुठेही बॉम्ब आढळून आला नाही.
धमकी देणारा कॉल फेक असल्याची पुष्टी पोलिसांकडून करण्यात आली आहे. तरीही फोनवरून धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण? त्याचा या कृत्यामागचा नेमका उद्देश काय? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी अज्ञातावर कलम 385, 336 आणि कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.