काही कामगार ढिगाऱयाखाली अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील अलिपूर भागात शुक्रवारी एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काही कामगार ढिगाऱयाखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. सायंकाळपर्यंत 9 जणांना ढिगाऱयातून बाहेर काढण्यात यश आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगाऱयाखाली जवळपास 25 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अलिपूर भागात बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास कोसळली. पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विटांची भिंत कोसळल्याने ढिगारा हटवण्यात अडचणी येत होत्या. अशा स्थितीत जेसीबी मशीनच्या सहाय्याने भिंतीचा ढिगारा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. अपघातानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त करतानाच घटनास्थळी व्यापक मदतकार्य राबविण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय अधिकाऱयांना दिल्या. ‘अलिपूरमध्ये एक दुःखद अपघात झाला. जिल्हा प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. मी वैयक्तिकरित्या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहे. दिवंगत आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना’ असे ट्विटही त्यांनी केले आहे.
कॅनॉट प्लेस येथील रेस्टॉरंटमध्ये आग
भिंत कोसळण्याच्या घटनेपूर्वी शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील एका रेस्टॉरंटमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाडय़ा घटनास्थळी दाखल करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.