मोस्कोवाच्या जलसमाधीमुळे पुतीन यांच्यावर दबाव ः आता आरपारचा संघर्ष
युक्रेच्या चिवट प्रतिकारामुळे बॅकफूटवर आलेले रशियाचे सैन्य आता नव्याने हल्ल्याची तयारी करत आहे. या युद्धावर आता आण्विक हल्ल्याचा धोका घोंगावू लागला असून यासंबंधी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने देखील इशारा दिला आहे. रशियाचे न्युक्लियर बॉम्बर युक्रेनच्या सीमेनजीक उड्डाण करताना दिसून आले आहेत. काळय़ा समुद्रात रशियाची युद्धनौका मोस्कोवा बुडाल्याने ब्लादिमीर पुतीन यांच्यावरील दबाव वाढल्याचे मानले जात आहे.
पश्चिम रशियाच्या आकाशात टीयू-160 स्ट्रटेजिक बॉम्बवर्षक विमान दिसून आले आहे. मॉस्को आणि युक्रेनच्या सीमेदरम्यान कलुगा क्षेत्रातून समोर आलेल्या व्हिडिओत चार विमाने दिसून आली असून यातील एकाचा वापर अण्वस्त्र वाहून नेण्यासाठी केला जातो. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने यासंबंधी कुठलीच माहिती दिलेली नाही. तर टीयू-95 विमानाचा वापर युक्रेनवर बिगर आण्विक अस्त्रांद्वारे हल्ला करण्यासाठी यापूर्वी करण्यात आला आहे. या हल्ल्यांकरता केएच-55 आणि केएच-101 क्रूज क्षेपणास्त्रs वापरण्यात आली होती.
रशियाने मागील काही दिवसांमध्ये कीव्ह आणि लवीव यासारख्या युक्रेनमधील प्रमुख शहरांना लक्ष्य केले आहे. टीयू-95 एकमात्र प्रोपेलर संचालित स्ट्रटेजिक बॉम्बवर्षक विमान असून अद्याप ते मोहिमेकरता वापरले जात आहे. या प्रकारच्या विमानाने स्वतःचे पहिले उड्डाण 70 वर्षांपूर्वी केले होते. मोस्कोवा युद्धनौका बुडाल्याने रशियाला युक्रेनमधील स्वतःची रणनीति बदलणे भाग पडले आहे.