एफटीओ, कुलिंग पीट, आयएलएस, आरएमओचे काम प्रगतिपथावर : प्रवासी संख्येतही वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव विमानतळाचे सध्या विकासाच्या दिशेने उड्डाण सुरू आहे. फ्लाईंग टेनिंग ऑर्गनायझेशन (एफटीओ), आरएमओ, आयएलएस व कुलिंग पीट अशी विविध कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे काही दिवसांमध्ये बेळगाव विमानतळावर अनेक सेवासुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत.
विमानतळासाठी 2 एफटीओंना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार दिल्ली येथील रेड बर्ड या कंपनीने आपल्या शेडच्या निर्मितीचे काम पूर्ण केले असून, याचे डिसेंबर महिन्यात उद्घाटन होण्याची शक्मयता आहे. यामुळे बेळगावमध्ये खासगी विमान प्रशिक्षणदेखील सुरू होणार आहे. बेंगळूर येथील समवर्धने या कंपनीकडूनही लवकरच हँगर उभारणी केली जाणार आहे. याचबरोबर एअरक्राफ्टच्या दुरुस्तीसाठी आरएमओला मंजुरी देण्यात आली असून, लवकरच हँगर उभारणी केली जाणार आहे.
खराब हवामानातही विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी आयएलएस यंत्रणेची आवश्यकता असते. बेळगाव विमानतळाला यापूर्वीच आयएलएस मंजुरी मिळाली असून, पुढील महिन्यात यासाठी निविदा काढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे यापुढील काळात आयएलएस यंत्रणा वापरात आल्यास खराब हवामानातही धावपट्टीवर विमान उतरविणे सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर कुलिंग पीटची निर्मिती केली जाणार आहे. धोकादायक स्फोटके आढळल्यास ती निकामी करण्यासाठी कुलिंग पीटची आवश्यकता असते.
प्रवासी संख्येत हुबळीला टाकले मागे
बेंगळूर व मंगळूर या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांनंतर बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱयांची संख्या सर्वाधिक आहे. मागील महिन्यात शेजारील हुबळी विमानतळ प्रवासी संख्येत पुढे गेले होते. परंतु या महिन्यात पुन्हा एकदा हुबळीला मागे टाकत बेळगावने आपले तिसरे स्थान अबाधित राखले. ऑक्टोबर महिन्यात 27 हजार 262 प्रवाशांनी प्रवास केला असून 522 विमानांची ये-जा होती. सध्याच्या घडीला दिल्ली, सुरत, अहमदाबाद, जोधपूर, मुंबई, नागपूर, इंदूर, तिरुपती, हैदराबाद व बेंगळूर या 10 शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे.
प्रवासी संख्या
- एप्रिल 34 हजार 689
- मे 37 हजार 301
- जून 32 हजार 940
- जुलै 25 हजार 943
- ऑगस्ट 23 हजार 145
- सप्टेंबर 22 हजार 566
- ऑक्टोबर 27 हजार 262