Tarun Bharat

दाभाळच्या उण्णै नदीला पूर

दाभाळ-निरंकाल गावांचा संपर्क तुटला

वार्ताहर /दाभाळ

गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱया पावसामुळे मंगळवारी निरंकाल व दाभाळ या गावामधून वाहणाऱया उण्णै नदीला पूर आला. त्यामुळे पेण्यामळ निरंकाल भागातील मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने निरंकाल व दाभाळ गावाचा संपर्क तुटला. दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने कामगारवर्ग, विद्यार्थी व अन्य प्रवाशांचे हाल झाले. निरंकालहून हाकेच्या अंतरावर असलेले दाभाळ गाव गाठण्यासाठी या मार्गावरील वाहनांना धारबांदोडा किंवा पाज, बिंबळ, वागोण मार्गे पर्यायी रस्ता धरावा लागला.

गेल्या वर्षीही जुलै महिन्यात उण्णै नदीला असाच महापूर आला होता. त्यावेळी पेण्यामळ, तारीभाट, जांभळीमळ, सातेरीमळ, माट्टीधाड ही गावे पाण्याखाली गेल्याने अनेक घरांची मोठी नुकसानी झाली होती. मागील काही वर्षांमध्ये या नदीला सातत्याने पूर येत आहे. त्यामुळे दोन ते चार दिवस पुराचे पाणी ओसरेपर्यंत दाभाळ व निरंकाल भागाचा संपर्क तुटतो. नदीच्या काठावर वसलेल्या माट्टीधाड, तारीभाट व पेण्यामळ गावातील बहुतेक लोकांना या पुराचा फटका बसतो. सोमवारपासून कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला व रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. सायं. कामावरून घरी परतणारे कामगार व विद्यार्थी वाटेत अडकून पडले. पावसाचा जोर कायम राहिल्यास अजून एक दोन दिवस पूरजन्य स्थिती कायम राहण्याचा धोका आहे. त्यामुळे आसपास राहणाऱया नागरिकांनी धसका घेतला आहे.

येथील सोनू गावकर व मंगलदास गांवकर यांच्या घरापर्यंत पाणी पोचले होते. उण्णै नदीला पूर येण्याची घटना आता दरवर्षी घडू लागल्याने त्यावर उपाय म्हणून सखल भागात असलेल्या रस्त्याची उंची वाढविणे किंवा सातेरीमळ निरंकाल ते दाभाळ पर्यंत उड्डाणपूल उभारल्यास त्यावर कायमचा तोडगा निघू शकतो. नदीच्या एका बाजूला असलेला निरंकाल भाग शिरोडा मतदारसंघात तर पलिकडील दाभाळ भाग सावर्डे मतदारसंघात येतो. शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर हे भाजपा सरकारमध्ये मंत्री आहेत. तसेच गणेश गावकर हे ही सत्ताधारी भाजप सरकारमध्ये असून राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर हे दाभाळ गावचे रहिवासी आहेत. या तिन्ही लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे तात्काळ लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

वेर्णातील रेल्वे यार्डात कोळसा साठवल्याने स्थानिक लोक संतप्त

Amit Kulkarni

मडगाव नगराध्यक्षपदी घनश्याम शिरोडकर

Amit Kulkarni

शेकडो वैशिष्टय़ांसह तीन इलेक्ट्रिक स्कुटर्स दाखल

Amit Kulkarni

कोरोनामुळे राज्यात एकाच दिवसात तिघांचे बळी

Patil_p

गुळेली-कणकिरेला चक्रीवादळाचा तडाखा

Amit Kulkarni

भूतखांब पठारावरील अनोखा दसरोत्सव..!

Patil_p