पोर्ट ब्लेअर / वृत्तसंस्था
अमेरिकेमध्ये काही दिवसांपूर्वी ज्या प्रमाणे आकाशात उडणाऱया फुग्यांमुळे खळबळ उडाली होती, तशा स्वरुपाच्या उडत्या वस्तू भारताच्या अंदमान-निकोबार द्वीपसमूहावरही आढळून आल्या आहेत, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. ही उडती वस्तू अमेरिकेच्या आकाशात आढळलेल्या फुग्यासारखींच दिसत होते, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अमेरिकेने हे फुगे पाडविले होते. भारताने मात्र या वस्तूसंदर्भात कोणती कृती केली यासंबंधीची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, आता या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे.
अमेरिकेवर सोडण्यात आलेले फुगे चीनचे होते हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील मतभेदांमध्ये वाढही झालेली दिसून आली. भारताने आता यासंबंधी अधिक सावधपणा दाखविण्याचा निर्णय घेतला असून पुन्हा अशी वस्तू दिसल्यास कदाचित भारतही कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. फुग्यांच्या साहाय्याने चीन अमेरिकेच्या अंतर्भागात हेरगिरी करीत आहे, असा आरोप केला जात होता. अंदमानात दिसलेल्या या गूढ वस्तूच्या स्रोतासंबंधी कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, यातही चीनचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
अंदमानान 2022 मध्ये अशी उडती वस्तू दिसून आली होती. मात्र ती भारतीय रडार यंत्रणेला दिसून आली नव्हती. त्यामुळे सरकार आता अधिक सजग झाले असून या बेटांवरची संरक्षण व्यवस्था अधिक प्रबळ केली जात आहे. दुसऱया महायुद्धात असे महाकाय फुगे हेरगिरीसाठी उपयोगात आणण्यात आले होते. आता चीन त्या जुन्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे का, असाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.