गोलफरकाच्या निकषावर भारत मजबूत स्थितीत, अफगाणसाठी महत्त्वाची लढत
कोलकाता / वृत्तसंस्था
भारतीय संघ आशियाई चषक पात्रता फेरीतील लढतीत आज अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल, त्यावेळी अनुभवी सुनील छेत्री कंबोडियाविरुद्ध मागील लढतीतील आपला बहारदार फॉर्म कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. 37 वर्षीय सुनील छेत्रीने यापूर्वी मागील सामन्यात पूर्ण 3 गुण वसूल करुन देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
गोलफरकाच्या निकषावर भारतीय संघ सध्या हाँगकाँगपेक्षा सरस आहे. जॉन अँडरसनच्या प्रशिक्षणाखालील हाँगकाँग संघाने बुधवारी झालेल्या आपल्या सलामीच्या लढतीत अफगाणवर 2-1 असा विजय मिळवला होता.
सलग दुसऱयांदा आशियाई चषक फायनल्समध्ये पात्रता मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणारा भारतीय संघ सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली अव्वल दर्जाची कामगिरी साकारण्यासाठी सज्ज आहे. लिस्टन कुलासो, मानवीर सिंग, उदांता सिंग, करुनियन, रोशन सिंग यांची फिनिशिंगची क्षमता भारतासाठी बलस्थान असेल.
यापूर्वी पहिल्या सामन्यात यातील बहुतांशी खेळाडूंना उत्तम संधी लाभली. पण, त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्याच्या निकषावर ते काही अंशी कमी पडले. छेत्रीने मात्र गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत आपल्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या 82 वर नेली. सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलच्या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो (117) व लायोनेल मेस्सी (86) आघाडीवर आहेत.
छेत्रीनंतर काय? तूर्तास चिंता नाही!
छेत्रीनंतर काय, या प्रश्नाला उत्तर देण्याचा आता आपल्याला कंटाळा आला आहे, असे स्टिमॅक याप्रसंगी म्हणाले. ‘सुनील संघात खेळत आहे, तोवर अन्य खेळाडू गोल करत आहेत का, याची आम्ही चिंता करणार नाही. कारण, तो नसेल तर अन्य खेळाडू गोलजाळय़ाचा अचूक वेध घेण्यास सुरुवात करतील. त्यामुळे, जर छेत्री रोज प्रत्येकी दोन गोल करत असेल तर आणखी कोणाकडून अपेक्षा ठेवण्याची गरज काय’, असा प्रतिप्रश्न त्यांनी येथे केला.
अफगाणसाठी आजचा सामना करा वा मरा धर्तीवरील असून शारीरिकदृष्टय़ा अधिक मजबूत खेळाडूंचा हा चमू रोशन सिंग, संदेश झिंगन, अन्वर अली व आकाश मिश्रा या भारतीय बॅकलाईनविरुद्ध वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. साहजिकच, चुरशीची ठरु पाहणाऱया या लढतीत प्रारंभी गोल नोंदवत प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
रोशन सिंगला तंदुरुस्तीची समस्या जाणवत असून तो या सामन्यापूर्वी पूर्ण सावरलेला असेल, अशी व्यवस्थापनाला अपेक्षा आहे. भारताने अफगाणविरुद्ध मागील 10 लढतीत 6-1 असे यश मिळवले आहे. मात्र, 3 जानेवारी 2016 मधील सॅफ चॅम्पियनशिप लढतीनंतर ते या संघाविरुद्ध एकही विजय मिळवू शकलेले नाहीत. यापूर्वी वर्ल्डकप क्वॉलिफायर लढतीत त्यांनी 1-1 अशी बरोबरी प्राप्त केली होती.