इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन ः तैपेईच्या तिएन चेनकडून पराभव
वृत्तसंस्था/ जकार्ता
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनकडून त्याला संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱया लक्ष्य सेनला झुंजार लढत दिल्यानंतरही ही लढत 16-21, 21-12, 14-21 अशी गमवावी लागली. एक तास दोन मिनिटे ही लढत रंगली होती. या सामन्यात 32 वर्षीय चेनने प्रारंभी आघाडी घेतली आणि बेकपर्यंत ती 11-9 अशी केली. सेनने हा गेम शेवटी 16-21 असा गमविला. दुसऱया गेममध्ये सेनने मुसंडी मारत आघाडी घेतली आणि वर्चस्व कायम राखत ब्रेकपर्यंत ती 11-5 अशी भक्कम केली. सेनने अखेरपर्यंत वर्चस्व ठेवत हा गेम 21-12 असा घेत बरोबरी साधली. निर्णायक गेममध्ये चेनने पुन्हा 3-0 अशी आघाडी घेतल्यानंतर ब्रेकपर्यंत ती 11-5 अशी केली. सेनला यानंतर पुनरागमन करता आले नाही आणि चेनने 21-14 असा हा गेम जिंकत आगेकूच केली. या दोघांत आतापर्यंत दोनदा गाठ पडली असून दोन्ही वेळेस चेनने बाजी मारली आहे.