आरोग्य खात्याची सूचना : गेल्या 24 तासात 6 नवे रुग्ण
प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे गुरूवारी 6 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 43 झाली आहे. दरम्यान सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्कचा वापर करावा व कोरोना नियमांचे पालन व्हवे अशी सूचना आरोग्य खात्याचे अवर सचिवांनी राज्यातील दोन्ही जिल्हाधिकाऱयांना केली आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोना सक्रिय रुग्ण खुपच कमी झाले होते व नवे रुग्ण मिळत नव्हते तथापि आता पुन्हा नवीन रुग्ण सापडू लागल्यामुळे चिंता वाढल्याचे समोर येत आहे. काल नव्याने सापडलेल्या 6 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले असून हॉस्पिटलात भरती करण्याची पाळी रुग्णांवर आलेली नाही. गेल्या 24 तासात 2 जण कोरोनामुक्त झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून बळी नसल्याने तो एक दिलासा मिळत आहे.
आतापर्यंत मिळून एकूण 3832 जण कोरोनामुळे बळी पडले असून बाधित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 245415 एवढी आहे त्यातील 241540 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. कोरोनापासून काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.