पालीकेच्या खास बैठकीत ठराव : मातीचा भराव टाकल्याप्रकरणी मुख्याधिकारी धारेवर,जीसुडामार्फत शहरातील फुटपाथवर पेव्हर्स बसविणार
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा तालुक्यातील भटक्या गुरांचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. पोलीकेतर्फे भटक्या गुरांसाठी निवारा शेडची उभारणी निरंकाल येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही काल गुरूवारी पालेकेच्या खास बैठकीत पुर्ण करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रितेश रवी नाईक यांनी दिली.
यावेळी कृषी मंत्री रवी नाईक, पालीकेचे मुख्याधिकारी योगीराज गोसावी व नगरसेवक उपस्थित होते. शहर व लोकवस्तीपासून दूर बेतोडा निरंकाल पंचायत क्षेत्रातील निरंकाल येथे शहरातील भटक्या गुरांसाठी पालीकेच्या फंडातून सुमारे 16 लाख रूपये खर्चुन शेड उभारण्यात येणार आहे. भटक्या गुरांना शहर परिसरातून निरंकाल येथे हलविण्यासाठी ‘टोईंग वाहन’ ची खरेदी पालीकेतर्फें करण्यात येणार आहे. सदर ठराव मंजूरीसाठी पालीका प्राधिकारण संचलनालय मडगांव येथे पाठविण्यात आलेला आहे. टय़ुलीप योजनेखाली पालीकेच्या अभियांत्रिकी व कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी दोन अभियंता व एका वकीलाची तात्पुरती भरती करण्यात येणार आहे. प्रशिक्षण काळात 10 हजार रूपये वेतन व कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर प्रशस्तीपत्र देण्याची सुलभ योजना असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितेसाठी भुयारी मार्ग सुसज्ज करणार
फोंडयातील दुचाकी व चारचाकींना भेडसावणाऱया पार्कीगसाठी खुल्या जागेचे पर्याय शोधून तेथे पार्किगसाठी जागा आरक्षित करण्याचे सोपस्कर पुर्ण करण्याकडे पालीकेचे कटाक्षाने लक्ष असल्याची माहिती दिली. जुने सुचनाफलक बदलून त्याजागी नवीन सूचनाफलक मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. चतुर्थीपुर्वी सर्व 15 प्रभागातील पथदीप बदलण्यात येईल. तसेच फोंडा पोलीस स्थानक येथील खुल्या जागेचाही सदुपयोग पार्कीगसाठी करण्यात येणार आहे. आल्मेदा हायस्कूलच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करताना सर्व विद्यार्थ्यांना भुयारी मार्गातून ये-जा ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आल्मेदा हायस्कूलच्या तीनही गेटमधून विद्यार्थ्याना एकाचवेळी न सोडता भुयारी मार्ग (सबवे) मार्गातून थेट प्रिन्स हेरीटेज इमारतीसमोरील पादचारी मार्गातून जुने बसस्थानक येथे सोडण्यात येईल. त्यानंतर सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना येथून घरी न्यावे अशी सोय करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी पादचारी मार्गावर स्टीलचे ग्रिल बसविण्यात येईल.
शहर परिसरातील उभारणार पादचारी मार्ग-मंत्री रवी नाईक
कृषी मंत्री रवी नाईक यांनी पादचाऱयाच्या सुरक्षितेसाठी शहर परिसरात अनेक ठिकाणी पादचारी मार्गावर पेव्हर्स घालण्याचा प्रस्ताव जीसुडाकडे मांडला होता, त्यालाही मंजूरी बैठकीत दिलेली आहे. राजीव गांधी कला मंदिर ते कृषी पणन केद्रासमोरील प्रभू हॉटेलपर्यंत, आल्मेदा हायस्कूल ते वारखंडे येथील हनुमान मंदिर, पंडीतवाडा ते वरचा बाजार फोंडा या ठिकाणी फूटपाथवर पेव्हर्स घालून सौदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. जीसुडाअंतर्गत पालीका बाजार, गोल्डन ज्युबली प्रकल्पाला चालना मिळणार आहे. जीसुडाअंतर्गत शहराच्या मास्टरप्लॉनसाठी निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सुचना ऐकून घेण्यासाठी खास बैठकही घेण्यात येईल. शहर परिसरातील पथदिपांच्या बिलाचा पालीकेवर वर्षाकाठी पडणारा 68 लाख रूपयांचा बोजा कमी करण्यासंबंधी मागीलवेळी प्रलंबित राहिलेल्या प्रश्नावर कालच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.
मातीचा भराव टाकल्यावरून पालीका मुख्याधिकारी धारेवर
पालीकासमोरील खुल्या जागते मातीचा भराव टाकल्याप्रकरणी नगरसेवक व्यंकटेश नाईक व पालीका मुख्याधिकाऱयांना धारेवर धरले. पालीकेसमोरील खुली जागा विक्री प्रदर्शन भरविण्यासाठी उपयुक्त ठरत होती. या जागेवर मातीचा भराव टाकण्याचे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे नगरसेवक व पालीका मुख्याधिकाऱयामध्ये शाब्दीक चकमक झाली. यावर भाष्य करताना नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी सविस्तर माहिती देणे टाळले. यात नेमका कोणाचा स्वार्थ दडलेला आहे यावर मात्र मोठे प्रश्नचिन्ह आहे. सदरप्रकरणी पालीकेने कंत्राटदाराविरोधात कारवाईचे संकेत दिले आहे.