ऑनलाईन टीम/तरुण भारत
ऐन गणेशोत्सवात पुण्यात मांजरीमध्ये बनावट पनीर कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. यात ८९९ किलो बनावट पनीर साठा जप्त करण्यात आलं होत. आता अशाच प्रकारची कारवाई अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर केली आहे. याकारवाईत तब्बल २२ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला. ५ सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनावाच्या अधिकाऱ्यांनी या कारखान्यावर छापा टाकला असता अस्वच्छ परिस्थितीत दूध पावडर आणि पामोलिन तेलाचा वापर करुन बनवलेले बनावट पनीर तसेच स्किम्ड मिल्क पावडर व पामोलिन तेल साठविल्याचे आढळले. साठ्यातून तपासणीसाठी नमुने घेत किंमत २ लाख ३९ हजार ८०० रूपये किंमतीचे १ हजार १९९ किलो पनीर, १८ लाख ७१ हजार ६५२ रूपये किंमतीचे ४ हजार ७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १ लाख ५३ हजार ६७५ रूपये किंमतीचे १ हजार ४८ किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण २२ लाख ६५ हजार २१७ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.
हे ही वाचा : सण-उत्सवाच्या काळात नागरीकांनो सतर्क राहा; पुण्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. घेतलेले नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले असून अहवाल प्राप्त होताच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि आयुक्त परिमलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील सहायक आयुक्त रुपाली खामणे, अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगपात व सोपान इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.