कोलकाता : फिफाचे माजी फुटबॉल पंच तसेच कोलकाता येथे स्थायिक झालेले सुमंता घोष यांचे गुरुवारी वयाच्या 70 व्या वषी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
सुमंता घोष यांच्या पश्चात पत्नी आणि दोन कर्ते चिरंजीव असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. 1952 साली त्यांचा जन्म कोलकातामध्ये झाला. 1990 साली सुमंता घोष यांना फिफाकडून अधिकृत पंच म्हणून मान्यता मिळाली. फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा पात्र फेरी तसेच ऑलिम्पिकपूर्व स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक सामन्यात पंचगिरी केली होती. फुटबॉल पंचगिरी क्षेत्रातून ते 1997 साली निवृत्त झाले. एएफसी क्लब चॅम्पियनशीप, सॅफ चषक, जवाहरलाल नेहरू चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये त्यांनी पंचगिरी केली होती. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे तसेच फुटबॉल क्षेत्रातील अन्य मान्यवरांनी सुमंता घोष यांना श्रद्धांजली वाहिली.