राज्यातील मराठा समाजबांधव 20 रोजी हजारोंच्या संख्येने सुवर्ण विधानसौधसमोर उपस्थित राहणार
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनतर्फे हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चलो सुवर्णसौधची हाक देण्यात आली आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्यातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मोहिमेची सुरुवात शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून झाली.
यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड म्हणाले, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 ते 29 डिसेंबर दरम्यान बेळगाव येथे होणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनतर्फे तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला अलीकडे विविध आश्वासने दिली आहेत. त्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या असल्या तरीही अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा समुदायाला सध्या इतर मागास वर्ग 3 ब असे आरक्षण आहे. मात्र त्यांचा इतर मागास वर्ग 2 ए मध्ये समावेश करण्यात यावा. अशी प्रमुख मागणी मराठा फेडरेशनतर्फे करण्यात आली आहे.
मराठा समाज बांधवांचा आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार
या मोहिमेंतर्गत बेळगाव शहर, बेळगाव तालुका, खानापूर, संकेश्वर, निपाणी, चिकोडा, अथणी, जमखंडी, गोकाक, रामदुर्ग येथे चलो सुवर्णशोध जनजागृती बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्मयातील मराठा समाज बांधवांनी आंदोलनाला यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले फेडरेशनचे उपाध्यक्ष मनोहर कडोलकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सकल मराठा अध्यक्ष किरण जाधव, निपाणीच्या सुमित्रा उघळे, युवा नेते विनय कदम यांनीही यावेळी समयोचित विचार व्यक्त केले. यांच्यासह अनके सदस्य उपस्थित होते.