प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही सीमाभागात कन्नडसह मराठीतून परिपत्रके देण्यास चालढकल केली जात आहे. यासंदर्भात म. ए. समितीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले असून, जिल्हा प्रशासनातर्फे यासंदर्भात कोणतीही हालचाल न झाल्यास सोमवार दि. 27 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
शनिवारी मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देताना त्यांना 20 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या काळात जर त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आता मोर्चासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. महामोर्चासाठी प्रत्येक विभागवार व गाववार बैठका घेण्याचे आवाहन मध्यवर्तीतर्फे करण्यात आले.
हुतात्मा स्मृती भवन बांधण्याचा निर्धार
हिंडलगा येथे हुतात्मा स्मारकानजीक भव्य हुतात्मा स्मृती भवन बांधण्यात येणार आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात देणगीचा ओघ सुरू झाला आहे. ट्रस्टच्या नावे बँक खाते उघडण्यात आले असून, कागदपत्रांची पूर्तता करताच नागरिकांकडून देणग्या स्वीकारल्या जाणार आहेत. भव्य स्मृती भवनासाठी प्रत्येक सीमावासियाने आपले योगदान द्यावे, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला बेळगाव शहर, तालुका, खानापूर व निपाणी येथील सदस्य उपस्थित होते.