सातारा / प्रतिनिधी :
सध्या नवरात्रोत्सव सातारा शहरात धुमधडाक्यात सुरू आहे. मात्र, याच उत्सवाचा गैरफायदा घेत एका व्यक्तीने मंडळाच्या नावाने सातारा नगरपालिकेच्या बारनिशीत अर्ज देऊन हॉरर शोसाठी चक्क ग्रेड सेपरेटर भाड्याने मागितला आहे. त्या मागणी पत्रावर असलेला नंबर चुकीचा आहे. दुपारपासून ते मागणी पत्र आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
त्या पत्रामध्ये नमुद केले आहे की, बाल गोपाळ मित्र मंडळ आपणास विनंती करतो की, गेल्या पंधरा वर्षांपासून आमचे मंडळ नवरात्र उत्सवात देखावे सादर करते. विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवते. आपल्या सातारा येथील ग्रेड सेपरेटरचा वापर नागरिक खूप कमी प्रमाणात करतात. दिवसातून दहा ते पंधरा वाहने जात असतील. नवरात्र उत्सवात सातारा शहर व ग्रामीण भागातून नागरिक देखावे पाहण्यासाठी येत असतात. यावर्षी नवरात्र उत्सवात देखाव्याबाबत मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत ग्रेड सेपरेटर मध्ये हॉरर शो करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातारा नगरपालिकेने हा कमी वापरात असलेला ग्रेड सेपरेटर आमच्या मंडळाला 9 दिवसासाठी देखावा करण्यासाठी भाड्याने देण्यात यावा, ग्रेड सेपरेटरचे भाडे मंडळाकडून देण्यात येईल, नगरपालिकेने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती केली आहे.
ग्रेड सेपरेटरमध्ये अनेक त्रुटी
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सातारा शहरात ग्रेड सेपरेटर बांधला गेला. तो बांधल्यानंतर सातारकरांना त्याचा उपयोग नेमका किती होतो, यापेक्षा त्याचा नेमका फायदा काय यावर नेहमी चर्चा होत असते. त्यात आज ही नवीन चर्चा सुरू झाली आहे.