प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ : जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
गाणीग (तेली) समाजाला 2अ प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, अधिकारी ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर तसेच या समाजातील नागरिकांवर अन्याय होत आहे. तातडीने याबाबत गांभीर्याने विचार करून या समाजातील नागरिकांना प्रवर्ग 2अ चे प्रमाणपत्र देण्यात अधिकाऱयांना भाग पाडा, अशी मागणी गाणीग समाजाने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कर्नाटकामध्ये गाणीग समाज मोठय़ा प्रमाणात आहे. विशेषतः बेळगाव तसेच उत्तर कर्नाटकामध्ये हा समाज मोठय़ा प्रमाणात आहे. असे असताना या समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. हा समाज मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने 2अ मध्ये समाजाचा समावेश केला होता. मात्र अधिकारी 2अ हे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे या समाजावर अन्याय होत आहे.
सरकारनेच लक्ष देण्याची गरज
सरकारचा आदेश असूनही अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर सरकारनेच याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तेली समाजातील नागरिक उपस्थित होते.