पुणे / वार्ताहर :
पुणे शहरात सिंहगड रोड परिसरातील धायरी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात सुबत्ता यावी आणि पुत्र प्राप्त व्हावी, यासाठी सासरच्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून सुनेला जबरदस्तीने हाडांची पावडर खाण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे.
याप्रकरणी एका कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव ( सर्व रा. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वषीय सुनेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, धायरी परिसरात पोकळे कुटुंबीय राहते. घरामध्ये सुख शांती नांदावी, भरभराट व्हावी आणि मूल बाळ व्हावे, यासाठी घरातील सुनेला घेऊन पती, सासू-सासऱ्यांनी अघोरी पूजा केली. या सोबतच सुनेला लग्नानंतर शिवीगाळ आणि मारहाणदेखील सासरच्या व्यक्तीकडून करण्यात येत होती. 27 एप्रिल 2019 पासून हा प्रकार सुरू होता. लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा सुनेकडे पैशांची मागणी केली. याबरोबरच सासरचे लोक महिलेला लग्नामध्ये मिळालेले दागिने माहेरहून आणण्याची मागणी करुन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी घरच्यांनी पुत्र प्राप्तीसाठी महिलेला घेऊन अघोरी पूजा केली. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडित महिलेने सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या लोकांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सासरच्या कुटुंबातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या व्यक्तींनी एकत्र येऊन घरात आणि स्मशानभूमीत अघोरी आणि जादूटोणा करुन पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम तीनअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.