ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6.90 किलो कोकेनची तस्करी करताना एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 69 कोटी रुपये आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
आर्टर्स लिओ झिनबर्ग्स (वय 24) असे या परदेशी नागरिकाचे नाव असून, तो युरोपमधील लॅटविजस रिपब्लिकचा रहिवाशी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झिनबर्ग्सचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्याच्याकडे ट्रॉली बॅग होती. संशय आल्याने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या बॅगमध्ये महिलांच्या चप्पल आणि कपड्यांशिवाय ‘किसाबोर’चे पाच पुठ्ठे सापडले. बॉक्स उघडल्यावर ‘किसाबोर क्रीम’ची छोटी पाकिटे सापडली. ही पाकिटे उघडली असता पांढर्या रंगाची पावडर प्लॅस्टिकच्या दुहेरी थराने पॅक केलेली आढळून आली. एनडीपीएस फील्ड टेस्ट किटमध्ये संबंधित पावडरची चाचणी केल्यावर ती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान एका ब्राझिलियन व्यक्तीने आर्थिक फायद्याच्या आमिषाने झिनबर्ग्सला मुंबईत तस्करी करण्यासाठी कोकेन दिल्याचे समोर आले.