द्विपक्षीय संबंधांची करणार समीक्षा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेश सचिव विनय क्वात्रा हे ऊर्जा आणि विजेसह सुरक्षेच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी आजपासून बांगलादेशच्या अधिकृत दौऱयावर असणार आहेत. बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱयात (15-16 फेब्रुवारी) क्वात्रा हे बांगलादेशचे विदेश सचिव मसूद बिन मोमन यांच्यासोबत सुरक्षा, जल, व्यापार आणि गुंतवणूक, वीज, ऊर्जा, संरक्षण, संपर्कव्यवस्था तसेच उपखंडातील सहकार्यासमवेत सर्व मुद्दय़ांवरील द्विपक्षीय संबंधांची समीक्षा करणार आहेत.
बांगलादेशचे विदेश सचिव मोमन यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार क्वात्रा यांचा हा दौरा होत आहे. क्वात्रा हे मंगळवारी नेपाळच्या दौऱयावर होते, तेथे त्यांनी दोन्ही देशांमधील बहुआयामी सहकार्यावर चर्चा केली आहे. क्वात्रा यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांची भेट घेत आर्थिक आणि विकास सहकार्यासह विविध क्षेत्रांशी निगडित द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा केली आहे.