युजीसीकडून मिळणार 10 वर्षांची मंजुरी : ऑनलाईन क्लासेसची नसणार परवानगी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) मंजुरी घ्यावी लागणार आहे. युजीसी प्रमुख एम. जगदीश कुमार यांनी ‘सेटिंग अप अँड ऑपरेशन ऑफ कॅम्पस ऑफ फॉरेन हायर एज्युकेशनल इन्स्टीटय़ूशन इन इंडिया’साठी मसुदा नियमनाची घोषणा केली असून यात कॅम्पस स्थापन करण्यासंबंधीचे नियम नमूद आहेत.
भारतात कॅम्पस स्थापन करणाऱया विदेशी विद्यापीठांना पूर्णवेळ अभ्यासक्रमाचे शिक्षण ऑनलाईन क्लासेसद्वारे देता येणार नसल्याची माहिती युजीसी प्रमुखांनी दिली आहे. विदेशी विद्यापीठांना कॅम्पस स्थापन करण्यासाठी प्रारंभी 10 वर्षांसाठीच मंजुरी दिली जाणार आहे. तसेच विदेशी विद्यापीठांना प्रवेशप्रक्रिया तसेच शुल्करचना निश्चित करण्याची सूट असणार आहे. भारतीय कॅम्पसमध्ये दिल्या जाणाऱया शिक्षणाची गुणवत्ता मुख्य कॅम्पसप्रमाणेच असावी हे या विदेशी विद्यापीठांना सुनिश्चित करावे लागणार आहे.
विदेशातून येणाऱया निधीचे आदान-प्रदान हे विदेशी चलन व्यवस्थापन अधिनियमाच्या अंतर्गत करावे लागणार आहे. विदेशी विद्यापीठांना दोन वर्षांच्या आत भारतात कॅम्पस स्थापन करावा लागणार आहे. युजीसीकडून अंतिम मंजुरी मिळाल्याच्या 45 दिवसांच्या आत कॅम्पसमधील शिक्षणप्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. विदेशी विद्यापीठांना युजीसीच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.
आरक्षण धोरण लागू करायचे की नाही याचा निर्णय संबंधित विदेशी विद्यापीठांना घ्यावा लागणार आहे. यात युजीसीची भूमिका नसणार आहे. मूल्यांकन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेतल्यावर आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था होऊ शकते असे जगदीश कुमार यांनी म्हटले आहे.