इंग्लंडची फलंदाजी-पाकची गोलंदाजी यांच्यात जुगलबंदी होण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ मेलबर्न
इंग्लंड व पाकिस्तान या दोन माजी विजेत्यांमध्ये आज रविवारी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाची लढत होत असून इतिहासाचा विचार करता पाकची तर फॉर्मचा विचार करता इंग्लंडची बाजू वरचढ आहे. दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
1992 मध्ये नाटय़मय स्थितीत इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने वनडे विश्वचषक जिंकला होता. तशाच्या परिस्थितीत यावेळी पाकने अंतिम फेरी गाठली असून 92 ची पुनरावृत्ती करण्यास बाबर आझमचा पाक संघ उत्सुक झाला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या आठवडय़ानंतर पाक संघ स्पर्धेबाहेर पडण्याच्या स्थितीत होता. भारत व झिम्बाब्वेकडून त्यांना पराभव स्वीकारावे लागल्याने त्यांचे मनोर्धर्यही खचले होते. दुसऱया आठवडय़ात मात्र नाटय़मय घडामोडीनंतर पाकला आगेकूच करण्याची संधी मिळाली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळविल्यानंतर त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी नशिबाच्या साथीची गरज होती. आणि 1992 मध्ये जसे घडले तसा चमत्कार यावेळीही घडला. तुलनेने नवखा असलेल्या नेदरलँड्स संघाने आजवरचे सर्वोत्तम प्रदर्शन करीत बलाढय़ दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायक पराभव करीत त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आणि पाकसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले गेले. पाक हा अनप्रेडिक्टेबल संघ असल्याचे नेहमीच म्हटले जाते. त्यांनी उपांत्य फेरीत शानदार प्रदर्शन करीत न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली.
पाकने 92 ची पुनरावृत्ती करावी, असे बऱयाच जणांना वाटत असले तरी विद्यमान इंग्लिश संघाचा ऑस्ट्रेलियन भूमीतील इतिहासही रंजक आहे. सात वर्षांपूर्वी 2015 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून पराभव झाल्यानंतर गटसाखळी फेरीतच इंग्लंडला स्पर्धेबाहेर पडावे लागल्याने त्यांच्या व्हाईटबॉल क्रिकेटला हादरा बसला होता. यानंतर इंग्लंड संघात बरेच बदल झाले, त्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला. त्यांनी आक्रमकतेवर भर दिला आणि त्यांच्या व्हाईटबॉल क्रिकेटला पुन्हा जोर आला. तीच निर्भिड मनोवृत्ती गुरुवारी भारताविरुद्ध उपांत्य लढतीत इंग्लंडने एकतर्फी विजय मिळविताना दाखवून दिली.
अंतिम सामन्यात शाहीन आफ्रिदी, वासिम ज्युनियर, हॅरिस रौफ यांना फक्त प्रेरणाच उपयोग ठरणार नाही तर बटलर, ऍलेक्स हेल्स, स्टोक्स, मोईन अली यांच्यावर वर्चस्व गाजविण्यासाठी अन्य मार्ग शोधण्याचीही गरज आहे. टी-20 क्रिकेटची इंग्लंडला बरीच सवय असल्याने 80000 हून अधिक पाकिस्तानी चाहत्यांना सुन्न करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ऍडलेडमध्ये 42000 हून अधिक भारतीय चाहत्यांना त्यांनी असेच स्तंभित केले होते.
मोठय़ा लढतीत नेहमीच एखादा बिग परफॉर्मर सर्वांचे लक्ष वेधून घेतो. 2019 वर्ल्ड कपमध्ये बेन स्टोक्सने इंग्लंडला जेतेपद मिळवून देताना अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्याची पुनरावृत्ती या सामन्यात त्याच्याकडून होऊ शकते. इंग्लंडकडून तशी अपेक्षाही केली जात आहे. मात्र सर्वात मोठा अडथळा ठरणार आहे तो पावसाचा. हवामान खात्याने रविवारी व राखीव दिवशी सोमवारीही जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने सर्वांचीच निराशा होऊ शकते. पावसामुळे सामना न झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळणार आहे.
टी-20 च्या नेहमीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास किमान पाच षटकांचा सामना खेळविला जातो. पण या स्पर्धेच्या तांत्रिक समितीने त्यात बदल केला असून किमान 10 षटकांचा सामना खेळवावा लागणार आहे. अशा वेळी गरज पडल्यास राखीव दिवशी मेलबर्नमधील वेळेनुसार दुपारी 3 वाजताच सामना सुरू करावा लागेल.
एमसीजीवरील स्पाईसी खेळपट्टीवर मार्क वुड इंग्लंडसाठी फायदेशीर ठरू शकतो. पण पाठदुखीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. हार्दिक पंडय़ाकडून भरपूर मार बसला असला तरी ख्रिस जॉर्डन हा टी-20 मधील एक उत्तम गोलंदाज असून बीबीएलमध्ये खेळण्याचा अनुभव तो येथे उपयोगात आणत पाकिस्तानी फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो. फलंदाजीचा विचार करता इंग्लंडचे हेल्स, बटलर, स्टोक्स, फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक, मोईन अली, लिव्हिंगस्टोन हे कागदावर तरी पाकच्या रिझवान, बाबर आझम, शान मसूद, हॅरिस, इफ्तिखार अहमद यांच्यापेक्षा सरस व मजबूत वाटतात. पण जेव्हा अत्यंत महत्त्वाचा सामना असतो, तेव्हा बडी नावे नव्हे तर कणखर मानसिकता आणि दीर्घ काळ टिकण्याचे टेम्परामेंट जास्त महत्त्वाचे व निर्णायक ठरते, हेही लक्षात घ्यायला हवे. पाकने 2009 मध्ये तर इंग्लंडने 2010 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता.
संभाव्य संघ ः इंग्लंड ः जोस बटलर (कर्णधार), ऍलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक, लिव्हिंगस्टोन, आदिल रशिद, मोईन अली, स्टोक्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, सॅम करन, मार्क वुड, टायमल मिल्स.
पाकिस्तान ः बाबर आझम (कर्णधार), रिझवान, शाद मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद वासिम, नसीम शाह, हॅरिस रौफ, शदाब खान, मोहम्मद नवाझ, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद हसनेन.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 वा..
कोट्स
आम्ही टी-20 वर्ल्ड कप जिंकू शकलो तर कतारमध्ये होणाऱया फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघाला त्याची पुनरावृत्ती करण्याची प्रेरणा मिळेल. खेळ हा इंग्लिश संस्कृतीचा भाग असून प्रत्येक वर्ल्ड कपवेळी सारे ब्रिटिश संघाच्या पाठीशी असतात.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर
शेवटच्या तीन सामन्यात आम्ही उत्तम प्रदर्शन केले असल्याने या लढतीसाठी नर्व्हस झालो नसून मी रोमांचित झालो आहे. दडपण असणार हे निश्चित, पण आत्मविश्वासाच्या बळावर त्याच्यावर मात करून यश मिळविता येते.
पाक कर्णधार बाबर आझम
संघांची कामगिरी
-इंग्लंड व पाक 30 वर्षांनंतर वर्ल्ड कप अंतिम लढतीत आमनेसामने
-याच मैदानावर पाकने 92 मध्ये इंग्लंडला हरवून वनडे जेतेपद पटकावले
-टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ दुसऱयांदा आमनेसामने. दोन्ही वेळेस इंग्लंड विजयी. 2010 मध्ये 6 गडय़ांनी, 2009 मध्ये 48 धावांनी इंग्लंडचा विजय
-दोघांत आतापर्यंत 28 लढती झाल्या. त्यात इंग्लंडने 18 तर पाकने 9 लढती जिंकल्या. एक सामना रद्द झाला.
-टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध 232 पाकची सर्वोच्च तर 89 सर्वात निचांकी धावसंख्या. पाकविरुद्ध इंग्लंडची 221 सर्वोच्च तर 13ग्न5 निचांकी धावसंख्या.